मुंबई विमानतळावर साडेसात कोटींचे कोकेन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:47+5:302021-06-26T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर एका झाम्बियन महिलेकडून ७०० ग्रॅम कोकेन ...

Cocaine worth Rs 7.5 crore seized at Mumbai airport | मुंबई विमानतळावर साडेसात कोटींचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर साडेसात कोटींचे कोकेन जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर एका झाम्बियन महिलेकडून ७०० ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याचे बाजारमूल्य साडेसात कोटी इतके आहे. या महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

एमिली मुलिंदे (वय ३१) असे या महिलेचे नाव असून, ती पश्चिम आफ्रिकेतील झाम्बियाची मूळ रहिवासी आहे. एडिस अबाबा विमानतळावरून एक महिला अमलीपदार्थ घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती डीआरआयला सूत्रांकडून मिळाली होती. इथोपियन एअरलाईनच्या विमानातून टर्मिनल २ वर आगमन झालेल्या एका महिलेच्या संशयास्पद हालचाली हेरून गुप्तचर विभागाच्या पथकाने तिची तपासणी केली. तिच्याकडील काळ्या रंगाच्या पर्समध्ये विशेष कप्पे करून पावडरसदृश वस्तू लपविल्याचे निदर्शनास आले. ते कोकेन असल्याची खात्री पटल्यानंतर डीआरआयने संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेकडून ७०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याचे बाजारमूल्य साडेसात कोटी इतके आहे. न्यायालयाने तिला ८ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान तिने दिलेल्या माहितीनुसार, एडिस अबाबा विमानतळावर इमिलिया फिरी नामक महिलेने तिच्याकडे हे पार्सल सुपूर्द केले. त्या मोबदल्यात ५ हजार डॉलर देण्याचे ठरले होते. त्यात अमलीपदार्थ असल्याची माहिती तिला होती. ही महिला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीची सभासद असल्याचा डीआरआयला संशय आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

..............................................................

Web Title: Cocaine worth Rs 7.5 crore seized at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.