Join us

श्रवणदोषावर 'कॉक्लीयर इम्प्लांट' एक वरदान; जनजागृतीसाठी लीलावती रुग्णालयात ख्रिसमस पार्टी

By संतोष आंधळे | Published: December 09, 2023 6:23 PM

ख्रिसमस डे च्या पार्श्वभूमीवर  कॉक्लीयर इम्प्लांट संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी  लिलावती रूग्णालयाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॉक्लीयर इम्प्लांट सर्जरी झालेल्या मुलांसाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजन शनिवारी लीलावती रुग्णालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमातील मुलांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई उपस्थित होते. श्रवणदोष किंवा श्रवणशक्ती बंद होणे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, कारण ते दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा निदान उशीराने होते. भारतात अनेक प्रकरणांमध्ये निदान विलंबाने होते. नवजात बाळांची जन्मानंतर नंतर लगेच श्रवणसंबंधी चाचणी केल्यास श्रवणदोष असल्यास तातडीने कळल्यास तातडीने उपचार करता येऊ शकतो. श्रवणदोषावर कॉक्लीयर इम्प्लांट एक वरदान ठरत आहे.

ख्रिसमस डे च्या पार्श्वभूमीवर  कॉक्लीयर इम्प्लांट संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी  लिलावती रूग्णालयाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात  पोस्ट- कॉक्लीयर इम्प्लांट केअर या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी १५ मिनिटांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.

कान-नाक-घसा सर्जन, डॉ क्रिस्टोफर डीसूझा म्हणाले की, ‘‘दरवर्षी सर्वसाधारणपणे २५ हजार बालके जन्मजात बहिरेपणा सारख्या समस्येने जन्माला येतात. श्रवणशक्ती कमी झाल्याने लहान मुलाच्या सर्वांगीण आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. वेळीच काळजी घेतली न गेल्यास श्रवणदोष हा मुलांसाठी जीवनभराचा दोष ठरतो.  मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे चिंता, नैराश्य आणि शैक्षणिक प्रगतीवर दुष्परिणाम होऊ शकतो. यापैकी बहुतेक प्रकरणे टाळता येण्याजोगी असतात आणि यासाठी वेळीच निदान होणं गरजेचं आहे.या उद्देशाने रुग्णालयाने कर्णबधिर किंवा श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना कॉक्लीअर इम्प्लांट प्रदान करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची श्रवण क्षमता पुन्हा प्राप्त करता येते.

या  कार्यक्रमात ईएनटी शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व सेवा उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.  

यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, “  मी एक दिग्दर्शक आहे, मी चित्रपट आणि कथा बनवतो. आम्ही चित्रपटांसाठी गाणी बनवतो आणि ऐकतो, आम्ही ध्वनी आणि दृश्याच्या मदतीने सर्वकाही बनवतो. तुम्ही सहनशील आहात असे कधीही समजू नका. ही मुले देवाचा आशीर्वाद आहेत. आज, कार्यक्रमाला उपस्थित असलेली काही मुले उद्याचे नेते डॉक्टर किंवा देशातील सेलिब्रिटी असू शकतात.

टॅग्स :हॉस्पिटल