नव्या आगारांच्या कामाचा नारळ फुटेना
By admin | Published: November 3, 2014 12:16 AM2014-11-03T00:16:56+5:302014-11-03T00:16:56+5:30
ठाणे परिवहन सेवेत येत्या काळात जेएनएनयूआरएमअंतर्गत २३० बसेस दाखल होत आहेत. यापैकी १० व्होल्व्हो बसेस दाखल झाल्या आहेत
अजित मांडके, ठाणे
ठाणे परिवहन सेवेत येत्या काळात जेएनएनयूआरएमअंतर्गत २३० बसेस दाखल होत आहेत. यापैकी १० व्होल्व्हो बसेस दाखल झाल्या आहेत. उर्वरित २० व्होल्व्हो आणि २०० सेमी लोअर फ्लोअर बसेसही सेवेत दाखल होणार आहेत. परंतु, सध्या आहे त्याच बसेस उभ्या करण्यासाठी परिवहनचे वागळे आणि कळवा आगार कमी पडत आहेत. त्यामुळे नव्या बसेससाठी घोडबंदर येथील मानपाडा आणि ओवळा आगार परिवहनने ताब्यात घेतले आहेत. परंतु, या दोन्ही आगारांची कामे अद्यापही सुरू न झाल्याने नव्या बसेस आणून उभ्या कुठे करायच्या, असा पेच परिवहनपुढे उभा ठाकला आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात नुकत्याच १० व्होल्व्हो बसेस दाखल झाल्या आहेत. सध्या आगारात जागा नसल्याने या बसेस नीळकंठ वुड्स येथे उभ्या केल्या जात आहेत. तसेच पुढील दोन महिन्यांत २० बसेस घेण्याचा परिवहनचा मानस आहे. या बसेस मानपाडा येथील आगारात उभ्या करण्याचेही परिवहनने निश्चित केले आहे. तसेच उर्वरित २०० बसेसही टप्प्याटप्प्याने परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. परंतु, सध्या परिवहनच्या वागळे आणि कळवा आगारांची क्षमता अपुरी असल्याने त्यांच्याकडे सध्याच्या ३१३ बसेस उभ्या करण्यासाठीच जागा अपुरी पडत आहे. वागळे आगारात जागा नसल्याने बसेस रात्रीच्या वेळेस आगाराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. हीच परिस्थिती कळवा आगाराचीदेखील असून या आगारातही जागा नसल्याने अर्ध्या बसेस रस्त्यावर आणि काही बसेस कळवा रुग्णालय परिसराच्या आवारात उभ्या केल्या जात आहेत.
आता परिवहनच्या ताफ्यात जेएनएनयूआरएमअंतर्गत २३० बसेस दाखल होत आहेत. तसेच खाजगी ठेकेदारामार्फत १०० बसेस घेतल्या जाणार आहेत. या बसेस येत्या नव्या वर्षात परिवहनमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या बसेस उभ्या करण्यासाठी परिवहनने घोडबंदर येथील ओवळा आणि मानपाडा येथील भूखंड ताब्यात घेतला आहे. ओवळा येथील डेपोच्या विकासाचा मार्ग आॅगस्ट महिन्यात मोकळा झाला असून स्थायीनेसुद्धा याच्या कामास येणाऱ्या खर्चासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी १५ कोटी २७ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच मानपाडा येथील डेपोसाठी ३ कोटी ४९ लाख ८० हजारांच्या खर्चालासुद्धा मंजुरी मिळाली आहे. आॅगस्ट महिन्यात हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाले.