एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 06:05 AM2024-07-20T06:05:28+5:302024-07-20T06:05:43+5:30
कंत्राटाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर कंपनीचे व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे.
मुंबई : एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणादरम्यान पर्याय देऊनही स्वतःसाठी जागा निर्माण करू न शकलेल्या ३०० कर्मचाऱ्यांना कंपनी नारळ देण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. हे कर्मचारी कंपनीमध्ये ठरावीक मुदतीच्या कंत्राटावर कार्यरत आहेत. त्यांच्या कंत्राटाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर कंपनीचे व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे.
हे कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंपनीच्या किमान विविध विभागांत सक्रिय आहेत. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवेची गरज भासणार नाही, अशा कर्मचाऱ्यांना अन्य प्रकारचे कौशल्य शिकत आपली जागा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न झाल्यास त्यांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत. अलीकडेच या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने स्वेच्छानिवृत्तीही जाहीर केली आहे. किमान ६०० कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील, असा अंदाज आहे. एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात आजच्या घडीला कायमस्वरूपी आणि कंत्राटी पद्धतीचे असे १९ हजार कर्मचारी आहेत; तर विस्तार कंपनीच्या ताफ्यात ६५०० कर्मचारी आहेत.