आचारसंहिता काढणार अर्थसंकल्पाची हवा
By Admin | Published: January 14, 2017 07:21 AM2017-01-14T07:21:15+5:302017-01-14T07:21:15+5:30
निवडणुकीच्या काळात प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरणारा अर्थसंकल्प या वेळेस बिनबोभाट जाहीर होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीची
शेफाली परब / मुंबई
निवडणुकीच्या काळात प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरणारा अर्थसंकल्प या वेळेस बिनबोभाट जाहीर होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मोठमोठ्या योजना व प्रकल्पांची घोषणा करून मतदारांना खुशीची गाजरे दाखवण्याची संधी हुकणार आहे.
मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक बुधवारी जाहीर झाली. या निवडणुकींची आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीच्या गेल्या चार बैठकांमध्ये साडेतीन हजार कोटींचे प्रस्ताव झटपट मंजूर केले.
बुधवारी संध्याकाळी आचारसंहिता जाहीर होणार असल्याने शिवसेनेने सकाळी ११ वा. महत्त्वाच्या बैठका बोलावून उरलेले प्रस्तावही मंजूर केले. मात्र आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही नवीन प्रकल्प व योजना राजकीय पक्षांना जाहीर करता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी प्रभावी माध्यम समजला जाणारा अर्थसंकल्प शिवसेनेसाठी निरुपयोगी ठरणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळात आचारसंहितेपूर्वीच अर्थसंकल्प जाहीर झाले होते. ज्याचा पुरेपूर फायदा सेना-भाजपा युतीला उठवता आला होता.