ठाणे-पालघरमधील आचारसंहिता अखेर संपली
By admin | Published: January 30, 2015 10:45 PM2015-01-30T22:45:48+5:302015-01-30T22:45:48+5:30
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांसह यातील १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सुमारे २८ दिवसांपूर्वी लागलेली आचारसंहिता शु
ठाणे: ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांसह यातील १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सुमारे २८ दिवसांपूर्वी लागलेली आचारसंहिता शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपली. यामुळे या दोन्ही जिल्ह्यात रखडलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दोन्ही जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांवर प्रशासक म्हणून संबंधीत मुख्य कार्यकारी अधिकारी कामकाज पहात आहेत. या कार्यक्षेत्रासह आमदार व खासदार निधींतील शेकडो कोटींचे विकास कामेया आचारसंहितेमुळे रखडली आहेत. या निवडणुकीसाठी प्रथमच अल्पावधीची आचारसंहिता लागली होती. तरीही नवनिर्वाचित आमदार व खासदाराना त्यांच्या पसंतीच्या विविध कामांचे उद्घाटन या आचारसंहितेमुळे करणे शक्य होत नव्हते. आता हा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह ११० गणांसाठी व पालघरजिल्हा परिषदेच्या ५७ गटांसह ११४ गणांच्या निवडणुकीसाठी सुमारे २८ दिवसांपासून आचारसंहिता लागली होती. निवडणूक कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे आज आचारसंहिता संपल्याचे म्हणता येईल असे ठाणे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील ५५ पैकी केवळ चार गटांसह निवडणूक होऊन शुक्रवारी मतमोजणी झाली. उर्वरित चार गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, पण सुमारे ४७ गटांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे निवडणूक झाली नाही. केवळ चार गणासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यानंतरच आचारसंहिता संपुष्टात आली. (प्रतिनिधी)