Join us

राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:47 AM

देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत.

मुंबई/बारामती - देशात आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्यानंतर आजच त्यांच्या जागी नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर याच आठवड्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते असा अंदाज आहे. त्यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी येथील बैठकीत उपस्थितांशी बोलताना राज्यात उद्यापासून आचारसंहिता सुरू होणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. 

देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत. भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर, काँग्रेसनेही २ याद्या जाहीर केल्या आहेत. आता, भाजपाने आणखी एक ९० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात महायुतीत तीन पक्ष एकत्र असल्याने अद्यापही २८ जागांवर महायुतीकडून उमेदवार घोषित होणार आहेत. तत्पूर्वीच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज सकाळपासूनच बारामतीत गाठीभेटी आणि सभांना सुरुवात केली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या ७ ठिकाण सभा होणार असल्याचे समजते. त्यासाठी, ते बारामतीमध्ये असून उद्यापासून आचारसंहिता लागू होईल, अशी माहितीच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे, याच आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यत आहे. 

मला साथ द्या, भावनिक होऊ नका - अजित पवार

तुम्ही मला आजपर्यंत साथ दिलेली आहे, तशाच प्रकारची साथ या पुढील लोकसभेच्या निवडणुकांतही द्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानेही मी घड्याळाच्या चिन्हावर तुम्हाला उमेदवार देणार आहे. त्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहा. केंद्राच्या योजना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणायच्या आहेत. त्यासाठी, तुमचीही साथ हवी आहे. कुठेही भावनिक होऊ नका, मी तुमचं नेहमी एकत आलोय, आता माझंही तुम्हाला ऐकावं लागेल. माझा शब्द तुम्ही मोडू नये, असे मला वाटतं, तो तुमचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.   

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईनिवडणूकआचारसंहिता