प्रवाशाच्या अंगावर कॉफी सांडणे विमान कंपनीसाठी महागात; साडेतीन लाखांची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:30 AM2019-05-15T04:30:58+5:302019-05-15T04:35:02+5:30
महिला प्रवाशाच्या अंगावर कर्मचा-याकडून कॉफी सांडल्याने तिच्या मांड्या आणि पोट भाजले.
मुंबई : महिला प्रवाशाच्या अंगावर गरम कॉफी सांडवून तिला साधी वैद्यकीय मदत पुरविण्याचीही तसदी न घेणाऱ्या एका विमान कंपनीला दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३ लाख ७१ हजार ३०० रुपये वैद्यकीय उपचारासाठी आलेला खर्च व मानसिक त्रासापोटी देण्याचा आदेश नुकताच दिला.
महिला प्रवाशाच्या अंगावर कर्मचाºयाकडून कॉफी सांडल्याने तिच्या मांड्या आणि पोट भाजले. तिला वैद्यकीय मदत न करता संपूर्ण प्रवासभर तिला त्रास सहन करायला लावणे म्हणजे ही एक प्रकारची क्रूरता आहे. विमानसेवेने कर्तव्यात कसूर केली आहे. तसेच अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे, असे निरीक्षण नोंदवित ग्राहक मंचाने एमिरेट एअरवेजला संबंधित महिला प्रवाशाला ३ लाख ७१ हजार ३०० रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. त्यात संबंधित महिलेने वैद्यकीय उपचारासाठी खर्च केलेले ७१ हजार ३०० रुपये, पुढील उपचारासाठी २ लाख ७५ हजार रुपये, मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये आणि तक्रार लढविण्यासाठी आलेला खर्च म्हणून १० हजार रुपयांचा समावेश आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती नोकरीनिमित्त नायजेरियात राहतात. सुटीसाठी संबंधित महिला प्रवासी लहान मुलीसह नायजेरियाला गेली. तेथून परतत असताना तिने एमिरेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट काढले. विमानातून प्रवास करत असताना हवाईसुंदरीच्या हातातील ट्रेमधून कॉफीचा कप महिलेच्या अंगावर पडला. इलेक्ट्रिक किटलीमध्ये कॉफी अत्यंत गरम होती. कॉफीमुळे तिच्या मांड्या आणि पोट भाजले. तिने तेथील कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार पेटी देण्यास सांगितले. मात्र, विमानात साधी प्रथमोपचार पेटी नव्हती.
येथील कर्मचाºयांनी तिला विमानात कोणतीही वैद्यकीय मदत न पुरविता नायजेरियावरून मुंबईपर्यंत तसाच प्रवास करायला भाग पाडले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरही तिला वैद्यकीय मदत पुरविण्याची साधी तसदी घेतली नाही.
अखेर मदतीसाठी पालक आणि काही नातेवाइकांना बोलावले. त्यांच्या मदतीने मुलुंडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून घरी सोडले. मात्र, रात्री तिला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. ७१ हजार ३०० रुपये बिलही भरावे लागले. शरीरावर भाजल्याचे व्रण दिसू लागल्याने प्लास्टिकसर्जरीचा निर्णय तिने घेतला. त्याचा खर्च ६ लाख ५० हजार रुपये सांगण्यात आला.
कंपनीने उत्तर न दिल्याने निर्णय एकतर्फी
संबंधित महिलेने एमिरेट एअरवेजला वारंवार मेल पाठवून आपल्याला वैद्यकीय उपचाराचा खर्च द्यावा, अशी मागणी केली. मात्र, तिला काहीही उत्तर देण्यात न आल्याने महिलेने वकिलाद्वारे कायदेशीर नोटीस बजावली. तरीही विमान कंपनीने तिला उत्तर दिले नाही. ग्राहक मंचानेही नोटीस बजावून विमान कंपनीने आपली बाजू न मांडल्याने अखेरीस मंचाने एकतर्फी निर्णय दिला.