Join us

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गातील कामाची एस. के. गुप्ता यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 3:34 PM

टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ आणि  दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजची परिषद संपन्न झाली. 

मुंबई- मुंबईत संपन्न झालेल्या टनेलिंग एशिया २०१९ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक सुबोधकुमार गुप्ता यांनी मेट्रो-३ या मुंबईतील पाहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पातील बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन व सुरक्षा याविषयी माहिती दिली. टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ आणि  दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजची परिषद संपन्न झाली. 

या परिषदेमध्ये इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष टॅर्सीसियो बी सेलेस्टिनो आणि उपाध्यक्ष मेस याब जिनिसीद यांची उपस्थिती होती. तसेच डीएमआरसीएलचे प्रकल्प संचालक दलजीत सिंह, टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संरक्षण मंत्रालयाचे माजी अभियंता, लेफ्टनंट जनरल सुरेश शर्मा, संरक्षण मंत्रालयाचे प्रभारी लेफ्टनंट जनरल एस. के. श्रीवास्तव, भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र कुमार शर्मा,  सीमा रस्ते-महानिर्देशक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संजय गुप्ता आणि टनेलिंग असोसिएशचे महासचिव व्ही. के. कांजलिया या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. 

भारतीय टनेलिंग उद्योगात कार्यरत असलेले केंद्रीय आणि राज्य सरकारचे सुमारे 300 व्यावसायिक, मेट्रो, जलविद्युत, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि सल्लागारांनी या परिषदेत सहभाग घेतला. आजची परिषद मेट्रो नेटवर्क, रेल्वे आणि महामार्ग, जलपुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलविद्युत आणि सिंचन पाण्याचे व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी भुयारीकरणाचे महत्त्व सांगणारी महत्त्वपूर्ण परिषद होती. विविध प्रकारच्या भुयारीकरणमधील आव्हानांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी एमएमआरसीचे प्रकल्प संचालक सुबोधकुमार गुप्ता म्हणाले, "या परिषदेमध्ये सहभागी होण्याचा आम्हाला आनंद होत आहे. देशात भुयारीकरणाचे कार्य वेगाने विकसित होत आहे. मुंबईतील मेट्रो लाइन ३ मार्गिकेप्रमाणेच दिल्ली, बंगलोर, जयपूर, कोलकाता आणि चेन्नई मेट्रो मार्गिकेची कामे विकसित होत आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्रात व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :मेट्रो