कुलाबा-वांद्रे-सीप्झ: चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकांदरम्यान बोगदा झाला तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:36 AM2020-10-17T08:36:33+5:302020-10-17T08:36:53+5:30
चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकांतील अंतर ६५३ मीटरचे आहे. भुयारीकरणादरम्यान एकूण ५०२ रिंग्जचा वापर केला गेला.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील चर्चगेट ते हुतात्मा चौक येथील मेट्रो स्थानकादरम्यान असलेला बोगदा शुक्रवारी पूर्ण करण्यात आला. मेट्रो ३च्या मार्गातील हे ३३ वे भुयारीकरण आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८८ टक्के भुयारीकरण व ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
चर्चगेट ते हुतात्मा चौक स्थानकांतील अंतर ६५३ मीटरचे आहे. भुयारीकरणादरम्यान एकूण ५०२ रिंग्जचा वापर केला गेला. अवघ्या २७५ दिवसांत डाऊन लाइन मार्गाचे भुयारीकरण एनएटीएम बोगद्यात पूर्ण करण्यात आले. एनएटीएम बोगद्यात पूर्ण होणारे हे मेट्रो-३ चे पहिलेच भुयारीकरण आहे. सूर्या - २ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हा बोगदा खणण्यात आला. दरम्यान, चर्चगेट आणि हुतात्मा चौक स्थानकादरम्यान असलेली व्यापारी केंद्रे याद्वारे जोडली जातील.
दक्षिण मुंबई परिसरातील फ्लोरा फाउंटनसह अन्य ऐतिहासिक इमारतींखालून भुयारीकरण करणे एक आव्हानात्मक काम होते. यासाठी कट ॲॅण्ड कव्हर आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग या दोन्ही पद्धतींचा सयुक्तिक वापर करून हे अभियांत्रिकी आव्हान पूर्ण करण्यात आले.
- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी