Join us

कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ-मरोशी मार्गावर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 8:31 AM

‘आरे’तील एकाही झाडांना धक्का नको; मुख्यमंत्र्यांची सूचना

ठळक मुद्दे‘आरे’तील एकाही झाडांना धक्का नको; मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुलाबा ते सीप्झ या भुयारी मेट्रो रेल्वे मार्गावर नवीन मेट्रो डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी येथे करण्यात येणार आहे. ‘आरे’तील राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी होईल, तर आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सध्या मरोळ-मरोशी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असून त्याच्याजवळच रॅम्प बनवून चाचणी मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकही झाड तोडण्यात येणार नाही. कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाइन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची कारखान्यातील तांत्रिक चाचणी झालेली आहे. चाचणीच्या मार्गावर मेट्रोच्या डब्यांची १० हजार किमींची चाचणी यशस्वी झाली की मग त्यानंतर संपूर्ण कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर ट्रेनची चाचणी घेतली जाईल. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्यासाठी उपलब्ध होतील, असे प्रशासनाने सांगितले.

काम अडीच महिन्यांत पूर्ण मेट्रोच्या चाचणीसाठी तात्पुरती सेवा उभारण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमुळे आता प्रकल्पास गती मिळेल. आतापर्यंत प्रकल्पात ९७ टक्के भुयारीकरण, तर सुमारे ७० टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या नमुना ट्रेनच्या चाचणीस सुरुवात करून आम्ही आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहोत. तात्पुरती सुविधा उभारण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून ते काम अडीच महिन्यांत पूर्ण होईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईमेट्रो