लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाच्या थंडीची लाट दाखल होत आहे. त्याची प्रचिती नागरिकांना शनिवारपासून आली असून, शनिवारी मुंबईचे किमान तापमान १६ तर महाबळेश्वर येथे १५ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा खाली उतरणार असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे नोंदविण्यात आले असून, ते ८.४ अंश सेल्सिअस आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईचे किमान तापमान खाली उतरले असून, ते १६ अंश नोंदविण्यात आल्याने येथील हवेत गारवा निर्माण झाला आहे. राज्यातही किमान तापमानात घट झाली आहे आणि पुढील काही दिवसांत यात आणखी घट नोंदविण्यात येईल.
२० जानेवारीपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील. २२ आणि २३ जानेवारीनंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंश खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातही किमान तापमानात घट होईल. किमान तापमान १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते, शिवाय किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ झाली होती. सरासरी तापमान ४ अंशांनी वाढले होते, शिवाय आकाश मोकळे होते. परिणामी, नागरिकांना उन्हाचे चटके बसत होते आणि दिवसासह रात्रीही किंचित उकाडा जाणवत होता. मात्र, आता किमान तापमानात घट झाल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.
----------------------
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नाशिक १४.५
पुणे १६
बारामती १५.९
सातारा १६.७
महाबळेश्वर १५.८
उस्मानाबाद १५.४
औरंगाबाद १६.७
माथेरान १६.८
अमरावती १५.५
चंद्रपूर १३.६
गडचिरोली १३.२
गोंदिया ८.४
नागपूर १२.६
वर्धा १४
मुंबई १६.६