मुंबई : राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ होऊ लागली आहे. दक्षिणेकडून वाहणाऱ्या उष्ण वाºयामुळे रविवारी राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.६ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात थंडी वाढल्याने बहुतांश शहरांचे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले होते. रविवारी किमान तापमान दोन अंकी नोंदविण्यात आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसरणार असल्याने यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
मुंबईसाठी अंदाज ३ फेब्रुवारीला मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १९ अंशांच्या आसपास राहील. ४ फेब्रुवारीला मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १८ अंशाच्या आसपास राहील.