थंडी लांबणीवर, नोव्हेंबरमध्येही पावसाळा; ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:00 AM2019-11-02T03:00:43+5:302019-11-02T03:01:09+5:30
दुपारनंतर मुंबईत पावसाची हजेरी
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘क्यार’ नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर गेले असतानाच, दुसरीकडे ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आता दक्षिण भारतापासून उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच, शुक्रवारी दुपारी दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण आणि मध्य मुंबईत तुफान फटकेबाजी केल्याने मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीसच पावसाळ्याचा अनुभव आला.
ऑक्टोबर संपून आता नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या महिन्यात कडाक्याची थंडी पडते, तेथे चक्क पाऊस थैमान घालत आहे. परिणामी, पावसाळा लांबल्याने आता थंडीही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रात एकाच वेळी उठलेली ‘क्यार’ आणि ‘महा’ ही दोन्ही चक्रीवादळे धुडगूस घालत असतानाच, आता ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यालगतच्या बंदरांना आणि मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण पश्चिम किनारपट्टीसाठी ३ नोव्हेंबरपर्यंत खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांनी किमान ३ नोव्हेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर येत्या २४ तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा, तसेच कर्नाटकच्या किनारी भागांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पावसाळी हालचालींचा वेग मंदावेल.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये एक-दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरनंतर वादळ दूर जाईल आणि परिस्थिती सुधारेल, शिवाय वाºयाचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे शुक्रवारी दुपारनंतर रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. केरळ राज्यातून सुरू झालेल्या ‘महा’ चक्रीवादळाची दिशा सध्या गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे आहे. हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत असल्याने कोकण किनारपट्टीला त्याचा धोका नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले. वादळाची तीव्रता अद्याप जिल्ह्याला जाणवली नसली, तरी शुक्रवारी दुपारनंतर काही प्रमाणात वारे वाहत होते. त्यातच पावसाने धडाका लावल्याने नागरिकांमध्ये ‘महा’ चक्रीवादळाची भीती निर्माण झाली. पावसाचा जोर सुरूच असल्याने नागरिकांनी सायंकाळी आपापले घर गाठण्यास सुरुवात केली. पावसाचा फटका प्रामुख्याने अलिबाग, पेण, रोहा आणि पाली या तालुक्यांना जास्त प्रमाणात बसला.