रेल्वे रुळांना थंडीचा तडाखा
By Admin | Published: January 20, 2016 02:31 AM2016-01-20T02:31:39+5:302016-01-20T02:31:39+5:30
राज्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीबरोबरच मुंबईतही यंदा चांगलीच थंडी पडली. या थंडीचा तडाखा मध्य रेल्वेवरील रुळांना बसत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : राज्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीबरोबरच मुंबईतही यंदा चांगलीच थंडी पडली. या थंडीचा तडाखा मध्य रेल्वेवरील रुळांना बसत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात उपनगरीय रेल्वेमार्गावर रुळांना तडा गेल्याच्या जवळपास १५ घटना घडल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे लोकल सेवेवर चांगलाच परिणाम होत आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रुळाला तडा जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी सकाळी सायनजवळ अप धीम्या मार्गावर रुळाला तडा गेल्याची घटना घडली आणि यामुळे लोकल गाड्यांना लेटमार्क लागला. सोमवारीही सीएसटी स्थानकात हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २वर दुपारी साडेतीनच्या सुमारास रुळाला तडा गेल्याची घटना घडल्याने हार्बर सेवा विस्कळीत झाली.
एकाच दिवशी तीन विविध ठिकाणी रुळाला तडा गेल्याच्या घटनाही १३ जानेवारी रोजी घडल्या आणि त्याचा मोठा फटका मध्य रेल्वेला बसला. या दिवशी सकाळी ६ ते ९ या तीन तासांत कल्याण, सायन आणि कर्जत स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्या. जानेवारी महिन्यात अशा प्रकारच्या जवळपास १५ घटना घडल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी मात्र अवाक् झाले आहेत. यामुळे लोकल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. सिग्नल आणि ट्रॅकची यंत्रणा आपल्याकडे असून, रुळाला तडा गेल्यास त्याची माहिती आपणास मिळते. त्याचप्रमाणे गँगमन, ट्रॅकमनकडूनही त्याची पाहणी केली जाते. मध्य रेल्वेमार्गावर डीसी ट्रॅक सर्किट यंत्रणा कार्यरत आहे. सीएसटी ते कल्याण आणि त्यानंतर कर्जतपर्यंत काही ठिकाणी टप्प्याटप्प्यावर, त्याचप्रमाणे हार्बरवही ही यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेमुळे रुळाला तडा गेल्याची बाब निदर्शनास येते.