लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन नाताळात मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले असून राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशाखाली घसरले आहे. नाशिकचा पारा तर ९.८ अंशावर दाखल झाला असतानाच मुंबई १५, तर पुणे १२.२ अंशावर आहे. मुंबईत रविवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान थंडीच्या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी किमान आहे.
मध्य भारतातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान घसरले असून, सकाळच्या थंडीने नागरिकांना हुडहुडी भरविली आहे. मुंबई आणि पुण्यासारखी शहरेदेखील गारठली असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशाखाली आले आहे. मुंबईसह पुण्याचे दुपारचे कमाल तापमानही ३० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. उत्तर भारतात थंडीने कहर केला असून, येथील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदविण्यात आले आहे.
कोणत्या शहरांत थंडी?
डहाणू १५.५, मुंबई १५, माथेरान १४.२, नाशिक ९.८, मालेगाव १४.४, जळगाव १०.७, पुणे १२.२, बारामती १३.२, सातारा १३.८, महाबळेश्वर १४.६, सांगली १५.३, औरंगाबाद १०.८, जालना १५.३, नांदेड, १५.६, परभणी १५, उदगीर १५.८, अमरावती १५, बुलढाणा १४.८, गोंदिया १४.४, नागपूर १५. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान येथील धुक्याचे प्रमाण अधिक असून, येत्या २४ तासांसाठी या राज्यात थंडीची लाट कायम राहील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"