Join us

मुंबईत थंडीचा पारा झाला कमी; कमाल तापमानात वाढ, राज्यात मात्र थंडीचा जोर कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:57 AM

२७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

मुंबई : डिसेंबर अखेर मुंबईच्या किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत असला तरी मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे. परिणामी ऐन नाताळात गारठा किंचित कमी झाला आहे. २८ डिसेंबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा जोर कायम राहील.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. 

दरम्यान, २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २७ डिसेंबर रोजी मुंबईत आकाश मोकळे राहील. २८ डिसेंबर रोजी मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील शहरांचे शनिवारचे किमान तापमान मुंबई १९.४, पुणे १२.७, जळगाव १२.७, महाबळेश्वर १४, मालेगाव १३.४, नाशिक १४.६, सातारा १४.४, सोलापूर १५.२, औरंगाबाद १२.१, परभणी ११.४, नांदेड १२.५, अकोला १२.५, अमरावती १२.४, बुलडाणा १२.८, चंद्रपूर १०.६, गोंदिया ८.२, नागपूर १०.४, वाशिम ११.२, वर्धा ११  (अंश सेल्सिअसमध्ये) 

टॅग्स :मुंबईतापमान