Join us

वर्षअखेरीस मुंबईत थंडी; किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:42 AM

पुढील काही दिवस गारवा राहणार कायम

मुंबई : गेले महिनाभर मुंबईकरांना हुलकावणी देणाऱ्या थंडीने वर्षाच्या शेवटी मात्र सुखावह हजेरी लावली. मंगळवारी सकाळी मुंबईच्या तापमानात घट होऊन किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हवेत गारवा वाढल्याने मुंबईकरांचा आनंद द्विगुणित झाला.उत्तरेकडील शीतल लहरी कायम असल्याने पुढील काही दिवस गारवा कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. राज्यात थंडीचा कडाका सुरू असून, काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपूरमध्ये मंगळवारीही तापमान ५.७ अंश सेल्सिअस राहिले. त्यात तुलनेत मुंबईत मात्र सोमवारचा दिवस हा डिसेंबर महिन्यातील दशकातील उष्ण दिवस ठरला होता. परंतु, मंगळवारी सकाळी ७.४० वाजता १७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या तापमानात आणखी घट होऊन कुलाबा १९ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे १६.४ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.विदर्भात पाऊसविदर्भात २ जानेवारीपर्यंत काही ठिकाणी पाऊस, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होईल. गुरुवारी किमान तापमानात घट होऊन ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उशिरा का होईना, पण मुंबईत थंडीचा महिना आला असून मुंबईकरांना आपले स्वेटर बाहेर काढण्याची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.