उष्माघात बाधित रूग्णांसाठी महापालिका रूग्णालयांमध्ये शीत कक्ष व्यवस्था

By संतोष आंधळे | Published: April 5, 2024 08:58 PM2024-04-05T20:58:44+5:302024-04-05T20:59:46+5:30

महानगरपालिकेकडून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना, येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Cold room system in BMC hospitals for heat stroke patients | उष्माघात बाधित रूग्णांसाठी महापालिका रूग्णालयांमध्ये शीत कक्ष व्यवस्था

उष्माघात बाधित रूग्णांसाठी महापालिका रूग्णालयांमध्ये शीत कक्ष व्यवस्था

मुंबई - उन्हाळ्यात उष्माघातासारखे प्रकार होऊ नये यासाठी, मुंबई  महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांत उष्माघात बाधित रूग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  महानगरपालिकेच्या १४ रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी शीत कक्ष (कोल्ड रूम) रूग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.

मुंबईतील १०३ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्येही वातानुकूलन (एअर कंडिशनर) व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचनांबाबत रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान तुलनेने अधिक असते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱया नागरिकांना उष्माघात  होण्याची शक्यता असते. उष्माघात झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करत विविध माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
 
या  आजाराची लक्षणे - प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.  लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे.

 उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ‘हे करा - डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी. - दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात रहावे, बाहेरील कामे सकाळी १० वाजेच्या आत अथवा सायंकाळी ४ नंतर करावीत. - पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश / उन्हाला टाळावे. - पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.

‘हे करू नका’ - उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. - दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर शक्यतो जाऊ नये - उन्हात चप्पल न घालता / अनवाणी चालू नये, - लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून वाहन बंद करू नये - चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत. - भर दुपारी गॅस किंवा स्टोव्ह समोर स्वयंपाक करणे टाळा.

Web Title: Cold room system in BMC hospitals for heat stroke patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.