Join us

थंडीची लाट ओसरली , मुंबईचा पारा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:15 AM

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात गेले काही दिवस पडलेल्या कडाक्याच्या थंडीने आता काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात गेले काही दिवस पडलेल्या कडाक्याच्या थंडीने आता काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान २० अंशाहून २२ तर कमाल तापमान ३२ अंशाहून ३५ वर पोहोचले आहे. वाढते तापमान, तप्त वारे आणि उकाडा, असे संमिश्र वातावरण मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान बुधवारी २२ अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले आहे. मुंबईचा पारा वाढला असून पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यातआले आहे.१८ ते २१ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. गुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशाच्या आसपास राहील. येथील आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: तप्त वारे वाहत असून, उन्हाचे चटकेही वाढले आहेत.विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.मुंबईकर घामाघूमसद्यस्थितीमध्ये अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास वेळ लागत आहे. हे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. त्यामुळेच दुपारनंतरचे वातावरण चांगलेच तापत असून, त्यामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत.