मुंबईसह राज्यभरातील थंडी महाशिवरात्रीपर्यंत कायम राहणार
By सचिन लुंगसे | Published: March 4, 2024 06:01 PM2024-03-04T18:01:41+5:302024-03-04T18:02:10+5:30
जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ तर दुपारचे कमाल तापमान २८-३० अंशादरम्यान आहे.
मुंबई : चाळीस अंश एवढया कमाल तापमानाने मुंबईकरांना भाजून काढले असतानाच आता पुन्हा एकदा हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकरांना थंडी वाजू लागली आहे. दिवसा चटके देणारे ऊनं आणि रात्री पडणारी आल्हादायक थंडी; अशा दुहेरी वातावरणाला मुंबई सामोरे जात असतानाच मुंबईसह राज्यभरातील थंडी महाशिवरात्रीपर्यंत कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ तर दुपारचे कमाल तापमान २८-३० अंशादरम्यान आहे. ही तापमाने सरासरी पेक्षा २ ते ४ डिग्रीने खाली आहेत. मुंबई १९ अंश आहे.
विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले आहे. पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात तीन दिवस ढगाळ वातावरण राहील.
पश्चिमेसह उत्तरेकडून वाहणा-या गार वा-यामुळे राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा किमान तापमानात घट झाली आहे. दोन दिवस थंडीचे वातावरण कायम राहील. त्यानंतर पुन्हा तापमान वाढेल. पुढील पाच दिवस तरी राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
८ मार्च, महाशिवरात्रीपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जाणवते. त्यानंतर मात्र किमान व कमाल तापमाने हळूहळू चढतीकडे झेपावतील. विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमाल व किमान तापमाने ही सरासरी तापमानापेक्षा खाली घसरल्यामुळे पहाटेचा गारवा टिकून आहे. दिवसाचा ऊबदारपणाही कमी जाणवत आहे.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ