मुंबईत वाहू लागले गारे गार वारे; किमान तापमान १७ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:37 AM2021-12-30T06:37:57+5:302021-12-30T06:38:12+5:30
Cold : भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र येथे बुधवारी किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली. गुरुवारी देखील येथे असे वातवरण असेल.
मुंबई : मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३०.३ आणि किमान तापमान १७.४ अंश नोंदविण्यात आले असून, मंगळवारी रात्रीसह बुधवारी सकाळी वातावरणात आलेल्या गारव्याने नागरिकांना थंडीचा आस्वाद दिला. शिवाय बुधवारी सायंकाळी देखील मुंबई शहर आणि उपनगरात गार वारा सुटला होता. त्यामुळे येथील हवामान आल्हादायक झाले होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र येथे बुधवारी किमान तापमानात घसरण नोंदविण्यात आली. गुरुवारी देखील येथे असे वातवरण असेल. शिवाय राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.
विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडल्या. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. आता ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, असे हवामान शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत २ अंशांनी घसरण
मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ उतार नोंदविण्यात येत आहेत. गेल्या दिवसांपासून किमान तापमान १९ अंशावर स्थिर होते. आता त्यात दोन अंशाची घसरण झाली. आणि हे किमान तापमान १७ अंशावर दाखल झाले. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत गार वारे वाहत असून, संध्याकाळसह रात्री गार वाऱ्याचा वेग अधिक आहे.
२ आठवड्याभरापूर्वी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र आता यात घसरण झाली आहे. हे कमाल तापमान ३० अंशावर दाखल झाले आहे. कमाल आणि किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना नववर्ष संपताना गारव्याचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.
किमान तापमान
अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई १७.४
पुणे १२.४
जळगाव १३.७
महाबळेश्वर -१२.३
नाशिक ११.६
औरंगाबाद ११.९
अमरावती १४.७
बुलडाणा १३
गोंदिया १४.२