मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईच्या रस्त्यांची वाट लावली असतानाच हे खड्डे कशाने बुजवायचे? यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिका प्रशासनाने शिफारस केलेल्या कोल्डमिक्सच्या वापरावर स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. या तंत्रज्ञानाची आयआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीच सदस्यांनी लावून धरली आहे. मात्र प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून ठरलेल्या नियमानुसार कोल्डमिक्सचा वापर करण्याची ताकीद सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अन्यथा सक्त कारवाईचे संकेतच पालिका प्रशासनानेदिले आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि प्रशासनामध्ये खडाजंगी होणार आहे.मुंबई खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरवत पावसाने रस्त्यांची चाळण केली. याचे तीव्र पडसाद मुंबईतच नव्हे तर देशाच्या राजधानीतही उमटले. थेट सर्वाेच्च न्यायालयानेच फटकारले, रेडिओ जॉकी मलिष्काचे खड्ड्यांवर विडंबन गीत, विरोधकांचा हल्लाबोल यामुळे मुंबईतील खड्डे गाजत आहेत. तरीही मुंबईत केवळ ३५८ खड्डेच असल्याचा दावा करणाºया महापालिकेला ‘लोकमत’ने ‘खड्डे करून दाखविले’ या मालिकेतून मुंबईतील रस्त्यांची खरी परिस्थिती दाखवून दिली. याची दखल घेऊन अनेक भागांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.मात्र कोल्डमिक्स मिश्रणाचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी खडी, पेव्हर ब्लॉक, डेब्रिजने खड्डे बुजविले जात असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले. यामुळे रस्ते असमतोल होऊन अपघाताचा धोका वाढतो आहे. तसेच रस्ते पुन्हा उखडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर रद्द करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली आहे. मात्र कोल्डमिक्स तंत्रज्ञान फेल गेल्याचा आरोप एकीकडे नगरसेवक करीत असताना योग्य पद्धतीने वापरल्यास मुंबई खड्डेमुक्त होईल, असा दावा पालिका प्रशासन करीत आहे.‘खड्ड्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करा’रस्त्यांवर पडणाºया खड्ड्यांमुळे होणारे अपघात व जीवितहानी याचे गांभीर्य लक्षात घेता मुंबईतील खड्ड्यांची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिम्का बुक आॅफ रेकोर्डमध्ये व्हावी, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) रोजगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नवीन लादे यांचे म्हणणे आहे. परिणामी याबाबतचा पत्रव्यवहार लादे यांनी संबंधितांशी केला आहे.‘स्थायी’ सदस्यांकडून कारखान्याची पाहणीकोल्डमिक्स तंत्रज्ञान पावसाळ्यातही प्रभावी ठरत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र जर्मनीवरून आणलेले व सध्या महापालिकाच तयार करीत असलेले कोल्डमिक्स मिश्रण पुन्हा उखडले जात असल्याचा आरोप नगरसेवक करू लागले. यामुळे कोल्डमिक्स तयार करणाºया कारखान्याची पाहणी स्थायी समितीच्या सदस्यांनी शनिवारी केली.आयआयटीमार्फत चौकशीची मागणीहा कारखाना सुरू असला तरी कोल्डमिक्सचा साठा मात्र तेथे नव्हता. कोल्डमिक्स फेल असल्याचा आरोप सर्व स्थायी समितीच्या सदस्यांनी केला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाची आयआयटीमार्फत चौकशी करावी, तसेच कोल्डमिक्सने बुजविण्यात आलेल्या सर्व रस्त्यांची माहिती मंगळवारपर्यंत देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले.
कोल्डमिक्सने फोडले नव्या वादाला तोंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 4:36 AM