खड्डे बुजविण्यात कोल्डमिक्स ‘फेल’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:20 AM2018-07-19T02:20:01+5:302018-07-19T02:20:08+5:30
पावसाळ्यात प्रभावी ठरेल, असा दावा करीत खड्डे भरण्यासाठी आणलेले कोल्डमिक्स ‘फेल’ झाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होऊ लागला आहे.
मुंबई : पावसाळ्यात प्रभावी ठरेल, असा दावा करीत खड्डे भरण्यासाठी आणलेले कोल्डमिक्स ‘फेल’ झाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. हे मिश्रण मिळत नसल्याने अनेक ठिकाणी खडी, पेव्हर ब्लॉक अशा मिळेल त्या साहित्याने खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे हे कोल्डमिक्स नव्हे, तर ‘झोल’मिक्स असून या तंत्रज्ञानाची शिफारस करणाऱ्या अधिकाºयाची चौकशी करा, अशी आक्रमक भूमिका विरोधक व पहारेकºयांनी घेतल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी खड्डेप्रकरणी स्थायी समितीच्या बैठकीत आज हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईत सुमारे साडेआठ हजार खड्डे असल्याचे काँग्रेसच्या खड्डे मोजण्याच्या मोहिमेतून उघड झाले. ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन म्हणजे मुंबईकरांची घोर फसवणूक आहे. फेल ठरलेले कोल्डमिक्स तंत्रज्ञान रद्द करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यांची ही मागणी अन्य सदस्यांनीही लावून धरली.
>कोल्डमिक्स नव्हे, ‘झोल’मिक्स!
परदेशातून आणलेल्या कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा प्रयोग गेल्या वर्षी यशस्वी ठरल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र १८० रुपये प्रति किलो मिळणारे हे तंत्रज्ञान महापालिका वरळी येथील कारखान्यात अवघ्या २८ रुपयांमध्ये तयार करीत आहे. यामुळे या मिश्रणाच्या दर्जाबाबतही साशंकताच आहे. पाऊस पडल्यावर हे मिश्रण तासाभरात धुऊन जात आहे.
त्यामुळे हे कोल्डमिक्स नव्हे, तर ‘झोल’मिक्स असल्याचा आरोप सदस्यांनी केला. हे मिश्रण कारखान्यात तयार करणे बंद करण्यात आल्याचाही आरोप सदस्यांनी केला. दरम्यान, याची शहानिशा करण्यासाठी स्थायी समितीचे सदस्य शनिवारी वरळी येथील कारखान्याची पाहणी करणार आहेत.
>ठेकेदारांना सूट, पेव्हर ब्लॉकने बुजविले खड्डे
कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने मुंबईतील खड्डे भरण्यात येत आहेत. यासाठी ३४० टन कोल्डमिक्स संपूर्ण २४ वॉर्डांत वाटण्यात आले असल्याचे, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.
मात्र ठेकेदारांना महापालिका कोणतेही साहित्य पुरवित नाही. त्यांची व्यवस्था त्यांनाच करावी लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत सर्वत्र कोल्डमिक्स वापरण्यात येत असले तरी ठेकेदार मात्र खड्डे बुजविण्यासाठी कोणतेही साहित्य वापरू शकतो. त्यामुळे व्हीआयपी विभागात ‘हॉटमिक्स’चा वापर होत आहे, हा दुजाभाव कशाला, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला.
>खड्डे भरण्याच्या साहित्याचा तुटवडा
अनेक ठिकाणी वॉर्डात खड्डे भरण्याचे काम ठप्प आहे. याबाबत विचारल्यास खड्डे भरण्याचे साहित्य पोहोचलेले नाही, असे सांगण्यात येत असल्याची तक्रार सर्वच नगरसेवकांनी केली. साहित्य मिळत नाही आणि खड्डे बुजविण्याच्या दबावामुळे विभागातील कामगार मिळेल ते साहित्य भरून खड्ड्यांचे तोंड बंद करीत आहेत. मात्र हे साहित्यही मुसळधार पावसात वाहून जात असल्याची नाराजी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.