‘कोल्डमिक्स’द्वारे मुंबईला खड्ड्यातून बाहेर काढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:28 AM2018-05-31T02:28:12+5:302018-05-31T02:28:12+5:30
मुसळधार पावसात मुंबईचे रस्ते खड्ड्यात जाणार असल्याची पुरेपूर खात्री असलेल्या महापालिका प्रशासनाने खड्डे दुरुस्तीसाठी तयारी सुरू केली आहे.
मुंबई : मुसळधार पावसात मुंबईचे रस्ते खड्ड्यात जाणार असल्याची पुरेपूर खात्री असलेल्या महापालिका प्रशासनाने खड्डे दुरुस्तीसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी गेल्या वर्षी यशस्वी ठरलेले कोल्डमिक्स हे अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले मिश्रण खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १७० रुपये किलो या दराने हे मिश्रण खरेदी करावे लागले होते. या वर्षी मात्र महापालिकेच्या वरळी येथील कारखान्यातच हे मिश्रण तयार झाल्याने महापालिकेची प्रति
किलो तब्ब्ल १४२ रुपये बचत होणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांचा आराखडा तयार करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले. मात्र मुंबई खड्डेमुक्त होण्याची शाश्वती महापालिकेला या वर्षीही नाही. मुसळधार पावसामुळे खड्डे पडणारच असे गृहीत धरून महापालिकेने खड्डे भरण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी महापालिकेने मुंबईच्या रस्त्यांवर ‘कोल्डमिक्स’ या मिश्रणाचा प्रयोग केला होता. याचे परिणाम चांगले दिसून आल्याचा पालिकेचा दावा आहे.
या वर्षी ‘कोल्डमिक्स’चे उत्पादन महापालिकेच्या वरळी येथील ‘अस्फाल्ट प्लान्ट’मध्येच करण्यात येत आहे. गेल्या वर्षी १७० रुपये किलो या दराने या मिश्रणाची खरेदी करण्यात आली होती. मात्र आता या मिश्रणाचे उत्पादन महापालिका स्वत:च करणार असल्यामुळे ‘कोल्डमिक्स’ २८ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होत आहे. महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘कोल्डमिक्स’ची नुकतीच विविध ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आली असल्याचे रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी सांगितले.
यामुळे मुंबई खड्ड्यात... : रस्ते विभागासाठी मुंबई महापालिका मोठी आर्थिक तरतूद करीत असते. मात्र तीन वर्षांपूर्वी उघड झालेल्या रस्ते घोटाळ्याने या कामांमध्ये सुरू असलेली अनियमितता दाखवून दिली. निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होत असल्याने ते उखडत असल्याचे समोर आले होते. मात्र हे वास्तव महापालिकेला मान्य नाही. सागरी किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबईचे भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात घेता रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता असते, असा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे.
अडीच हजार टन मिश्रण...
‘कोल्डमिक्स’ तंत्रज्ञान बाहेरून विकत घेण्याऐवजी महापालिकेने वरळी येथील आपल्याच कारखान्यात उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यादरम्यान या कारखान्यात सुमारे अडीच हजार टन मिश्रण तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारात प्रति किलो १७० रुपये असलेले कोल्डमिक्स २८ रुपये प्रति किलोने उपलब्ध होणार आहे.
वर्षभराचीच हमी
या पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांबाबत एका वर्षाची हमी संबंधित कंपनीने लेखी स्वरूपात दिली आहे. या हमीनुसार एका वर्षाच्या आत या ठिकाणीच पुन्हा खड्डा पडल्यास तो खड्डा भरण्यासाठी संबंधित कंपनीद्वारे ‘कोल्डमिक्स’ मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.