कंत्राटदाराकडून कोल्डमिक्सची थाप, रस्ते उखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:38 AM2018-08-30T05:38:38+5:302018-08-30T05:39:02+5:30
भायखळ्यातील प्रकार : पालिकेच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता
मुंबई : भायखळा पूर्वेकडील रामभाऊ भोगले मार्गावरील खड्डे बुजविताना कंत्राटदाराकडून मुंबई महाापालिकेच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. खड्डे बुजविताना ज्या तांत्रिक सूचना मनपाने कंत्राटदारांना दिल्या होत्या, त्या पाळल्या जात नसल्याने अवघ्या काही तासांतच खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे रामभाऊ भोगले मार्गावर दिसते.
या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांसोबत पोलीस प्रशासनही त्रस्त आहे. कारण याच मार्गाला लागून भायखळा पोलिसांची बीट क्रमांक १ आहे. बीटवरील पोलिसांना नेहमी गस्त घालण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. याशिवाय घोडपदेव, फेरबंदर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर माझगाव परिसरातील शिधावाटप कार्यालयासह अन्य महत्त्वाची कार्यालये गाठण्यासाठी करतात. त्यामुळे स्थानिकांमधून या खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रामभाऊ भोगले मार्गाला जोडून असलेल्या ई.एस.पाटणवाला मार्गावर पूर्व भायखळा मनपा शाळा आहे. या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांनाही अनेक वेळा वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात झाल्याचे स्थानिक पोलिसांनीच सांगितले. त्यामुळे एखाद्या गंभीर अपघाताच्या प्रतीक्षेत मनपा प्रशासन आहे का? असा सवाल स्थानिक आशिष चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
कंत्राटदारावर कारवाई होणार का?
च्खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करताना संबंधित खड्ड्यांचा आकार, उंची, रुंदी याकडे लक्ष देण्याच्या सूचना मनपाने केल्या होत्या, तसेच कोल्डमिक्स टाकल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत ते ठोकून कडक करण्याचेही मनपाने स्पष्ट केले होते.
च्मात्र, आहे त्या खड्ड्यांमध्ये कोल्डमिक्स टाकून काही मिनिटांतच कंत्राटदाराने नेमलेले कामगार खड्डे बुजविण्याच्या नावाखाली थूकपट्टी लावत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी बुजविलेले खड्डे बुधवारी पुन्हा दिसू लागल्याचा दावाही लिपारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
माहिती घेणार!
रामभाऊ भोगले मार्गासह विभागातील खड्ड्यांची तक्रार मनपात केली होती. त्याप्रमाणे, कोणते खड्डे कशाप्रकारे बुजविले, याची माहिती घेणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी योग्य तो पाठपुरावा घेतला जाईल.
- रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेवक.