मुंबई - शहर आणि राज्यभरातून जे.जे. रुग्णालयातील ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यात कॅन्सरपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, खोकला आणि तापाचे असल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. वातावरणातील बदलांमुळे गेल्या काही वर्षांत सार्वजनिक रुग्णालयांत येणाऱ्या या आजारांचे रुग्ण वाढले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही वर्षांपासून येथील रुग्णालय व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली काही तांत्रिक कारणामुळे बंद आहे. त्यामुळे रुग्णांची डिजिटलऐवजी लेखी नोंद ठेवली जात आहे. येथे दररोज ३ ते ४ हजार रुग्ण ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात, तर ११ लाख रुग्ण वर्षाकाठी रुग्णालयात विविध आजारांच्या उपचारासाठी येतात.
विषाणूच्या संसर्गामुळे मोठ्या आजारांपेक्षा सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयातील ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात. साधारणत: सर्वच सार्वजनिक रुग्णालयांत सर्दी, तापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येतात. - डॉ संजय सुरासे, अधीक्षक, जे.जे. रुग्णालय
कोणत्या विभागात किती जणांवर उपचार? विभाग रुग्ण मेडिसिन ६० - ७० हजार स्त्रीरोग २० - ३० हजार कान, नाक, घसा २० - ३० हजार अस्थिरोग ४० - ५० हजार नेत्र ५० - ६० हजार त्वचा ४० - ५० हजार सर्जरी ३० - ४० हजार दंत १० - २० हजार बालरोग १५ - २० हजार