शाहू महाराजांच्या स्मृतिस्तंभाचा पालिकेला विसर; स्मारकाची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:03 AM2023-05-04T07:03:37+5:302023-05-04T07:03:46+5:30
सुशोभीकरणाचा प्रस्ताव धूळखात, गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मात्र, गेली शंभर वर्षे ही वास्तू दुर्लक्षित राहिली.
श्रीकांत जाधव
मुंबई - लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे खेतवाडी येथील स्मृतिस्थळी शंभर वर्षांनी घडीव दगडी (कातळ) स्मृतिस्तंभ महापालिकेच्या मान्यतेने उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण गेल्यावर्षी झाले. मात्र, स्मृतिस्तंभ सुशोभीकरण आणि स्मारकाचा प्रस्ताव गेल्या वर्षांपासून पालिकेत धूळ खात आहे. त्यामुळे स्मारकाची पडझड होत असून, शाहूप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे.
पन्हाळा लॉज येथे शाहूंचे निधन
गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मात्र, गेली शंभर वर्षे ही वास्तू दुर्लक्षित राहिली. येथे स्मृतिस्थळ व्हावे, अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत मुंबई पालिकेने येथे आकर्षक पद्धतीने घडीव दगडी कातळ स्मृतिस्तंभ उभारला आहे. त्याची उंची १२ फूट आहे. अभिवादन सभा समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्रज्ञा जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
स्तंभासाठी आवश्यक काय हवे?
१) स्मृतिस्तंभाभोवती स्टीलचे रेलिंग हवे.
२) सजावटीसाठी लादीकरण
३) रात्री स्तंभावर प्रखर फोकस लाइट
४) स्वच्छतेसाठी पालिका कर्मचारी
५) सीसीटीव्ही कॅमेरे
६) पोलिसांची गस्त
आता काय स्थिती आहे?
१) स्मृतिस्तंभ भर रस्त्यात.
२) त्याला निवारा शेड नाही
३) सफाई नियमित नाही
४) सुशोभीकरण नाही
५) रेलिंग नसल्याने कोणीही बसते.
पालिका ‘डी’ प्रभागाकडे प्रस्ताव !
याबाबत पालिकेच्या अभियंत्यांशी संपर्क साधला. मात्र, स्तंभाचा प्रस्ताव पालिकेकडे दाखल केलेला नाही. आम्ही त्यांना नक्की मदत करू; पण समितीच हे काम करणार आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देणे टाळले.