मुंबई - आॅनलाइन औषध विक्रीला विरोध करीत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने देशपातळीवर शुक्रवारी एकदिवसीय संप पुकारला होता. या संपाला औषध विक्रेत्यांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.शिवाय, या संघटनेच्या वतीने आझाद मैदानात शहर-उपनगरातून जवळपास ३५०-४०० औषध विक्रेते सहभागी झाले. या वेळी, आॅनलाइन औषधविक्रीविरोधात एकत्र येऊन येत्या काळात मोठा लढा उभारला जाईल, असा इशाराही औषध विक्रेत्यांनी दिला.या संपात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन आणि ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्मासिस्ट संघटनांनी सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे काही औषध विक्रेत्यांची दुकाने सुरू असलेली दिसून आली. आॅनलाइन फार्मसीमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याने संपात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया केमिस्ट विक्रेते रणजीत राणावत यांनी दिली.केंद्र शासनाच्या आॅनलाइन औषध विक्रीच्या निर्णयामुळे केमिस्टकरिता केवळ झोपेची औषधे, मानसिक आजारासंबंधी, गर्भपाताच्या गोळ्या, अतितीव्र वेदनांवरील औषधे केवळ केमिस्ट वितरकांना दुकानांत विकायला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आॅनलाइन फार्मसीचा हा पर्याय आरोग्यसेवा आणि वैद्यकीय सेवेवर घातक परिणाम करणार असल्याचा या संघटनेचा दावा आहे. याच्याच निषेधार्थ हा संप केल्याचे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव प्रसाद दानवे यांनी सांगितले.या संपाविषयी, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचा संपात सहभाग नव्हता, मात्र आॅनलाइन फार्मसीला आमचा विरोध आहे. परंतु, रुग्णसेवेवरील परिणाम टाळण्यासाठी औषध विक्रीची सेवा आम्ही सुरूच ठेवली होती, असे तांदळे म्हणाले.६ हजार केमिस्टचा सहभागऔषध विक्रेत्यांच्या संपदरम्यान शहर-उपनगरातील तब्बल सहा हजार केमिस्टची दुकाने शुक्रवारी संपात सहभागी झाली. त्यात परळ येथील केईएम, नायर आणि रुग्णालयांबाहेरील सर्व केमिस्टची दुकाने बंद राहिली. रुग्णालयीन परिसरातील बहुतांश नागरिक रुग्णालयातील केमिस्टकडून औषध घेत होते. या संपाच्या काळात औषधाच्या तुटवड्याविषयी तक्रारींसाठी एफडीएने विशेष कक्ष स्थापन केला होता.
संपाला संमिश्र प्रतिसाद, औषध विक्रेता संघटनेचे आझाद मैदानात धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:15 AM