नांदगाव : पर्यटकांचे आकर्षण आलेल्या जंजिरा किल्ल्यावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रेरणेने श्री सदस्यांनी तीन दिवस स्वच्छता मोहीम राबवली होती. सुमारे ४०० दासभक्तांचा सहभाग असलेल्या या मोहिमेची गुरुवारी सांगता झाली. यावेळी किल्ल्याची स्वच्छता करताना पाच ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याचा परिसर चकाचक झाला असून त्याचे सौंदर्य आणखीच खुलून गेले आहे. किल्ल्यावरील झाडेझुडपे तोडण्यात आल्याने मूळ ऐतिहासिक अवशेष दिसू लागले आहेत. जंजिऱ्याचे १५ व्या शतकातील बांधकाम हे चुनखडी व शिशाच्या मिश्रणाचे असून ३५० वर्षांनंतर भक्कमपणाची साक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची संख्याही वाढण्याची शक्यता परिसरातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. तीन दिवसांत दासभक्तांकडून दोन मोठे तलाव, विहिरीची स्वच्छता करण्यात आली आहे. तलावातील शेवाळ व गाळ उपसल्याने पाणीसाठा वाढला आहे. मातीने भरलेल्या कलाल बांगडी, लांडा कासमसारख्या लोखंडी तोफा जागेवरच स्वच्छ करण्यात आला आहेत. पाणी बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे झाल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आहे. किल्ल्याची स्वच्छता करताना मूळ किल्ल्याला बाधा वा नुकसान होणार नाही, याची दक्षता दासभक्तांनी यावेळी घेतली आहे. (वार्ताहर)
पाच ट्रक कचरा गोळा
By admin | Published: April 10, 2015 10:45 PM