रिक्त घरांची माहिती गोळा करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 05:37 IST2025-02-20T05:35:53+5:302025-02-20T05:37:18+5:30
म्हाडा मुख्यालयात विविध मंडळांच्या मिळकत व्यवस्थापक विभागांच्या आढावा बैठकीत संजीव जयस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत. जयस्वाल म्हणाले, म्हाडाने आजवर राज्यात सुमारे ९ लाख घरे उभारली आहेत.

रिक्त घरांची माहिती गोळा करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : कोकण मंडळासह राज्यभरात म्हाडाची अनेक घरे रिक्त आहेत. मात्र, ही घरे नेमकी कुठे आणि किती आहेत, याचा थांगपत्ता म्हाडालाही नाही. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
म्हाडा मुख्यालयात विविध मंडळांच्या मिळकत व्यवस्थापक विभागांच्या आढावा बैठकीत संजीव जयस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत. जयस्वाल म्हणाले, म्हाडाने आजवर राज्यात सुमारे ९ लाख घरे उभारली आहेत. यापैकी २.५ लाख घरे केवळ मुंबई मंडळाच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे या घरांची संपूर्ण माहिती मंडळाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाच्या मिळकत व्यवस्थापकाने आपल्या कार्यक्षेत्रातील इमारतींची व गृहनिर्माण संस्थांची यादी तयार करून दोन आठवड्यांच्या कालावधीत सादर करावी, तसेच म्हाडा वसाहतींतील इमारती व त्यामधील घरांचे बाह्य यंत्रणांच्या साहाय्याने सर्वेक्षण करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. परिणामी म्हाडाकडे घरांचा पूर्ण तपशील उपलब्ध होईल. रिक्त तसेच विक्री अभावी पडून असलेल्या घरांची माहिती संकलित होणार आहे.
‘थकीत शुल्काचा अहवाल सादर करा’
थकीत सेवा शुल्कबाबत जयस्वाल यांनी सांगितले की, सर्व प्रथम मिळकत व्यवस्थापन विभागाने इमारत निहाय थकीत सेवा शुल्क व भूभाडे इत्यादिच्या थकीत रकमेची माहितीचा अहवाल मिळकत व्यवस्थापक कार्यक्षेत्रानुसार दोन आठवड्यात सादर करावा.
म्हाडाच्या अतिक्रमण निर्मूलन कक्षाला अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी कक्षात आवश्यक मनुष्यबळ, इतर यंत्रणा जसे वाहन, सीसीटीव्ही आदी बाबी सुरू करून हा कक्ष बळकट करावा. मुंबई मंडळाच्या धर्तीवर मुंबई इमारत दुरुस्ती, पुनर्रचना मंडळासाठीही अतिक्रमण निर्मूलन कक्ष सुरू करावा, असे त्यांनी सांगितले.