Join us

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पोटात गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:05 AM

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असतानाच संसर्गजन्य आजार, यकृत, तसेच पोटाच्या विकारांनी डोके वर ...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असतानाच संसर्गजन्य आजार, यकृत, तसेच पोटाच्या विकारांनी डोके वर काढले आहे. वातावरणात बदल होत असल्याने आजारांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळा सुरू होताच महिनाभरातच पोटासंबंधीच्या तक्रारी, यकृताच्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेण्यास रांगा लावल्या आहेत. यामध्ये अनेकांना अपचन, जठराला सूज येणे, आंबटपणा, पोटाशी संबंधित आजार, अल्सर आणि गॅस्ट्रोइफॅगेअल रिफ्लक्स रोग यासारख्या जठरासंबंधी समस्या उद्भवत आहेत.

पावसाळ्यामध्ये दूषित पाणी आणि हवामानातील बदल यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. कावीळ हे त्यापैकीच एक आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. कारण दूषित पाणी शरीरात गेल्यावर हिपॅटायटिससारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. यामुळे यकृताला सूज येऊ शकते. पावसात थंडगार वातावरणामुळे पाचकप्रणाली आणि प्रतिकाशक्तीला मोठा फटका बसतो. दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे अनेक विषाणू शरीरात प्रवेश करतात. यामुळे ताप, आतड्यांना सूज येणे, शौचातून रक्त पडणे असा समस्या उद्भवणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होते.

पोटविकारतज्ज्ञ डॉ. केयूर शेठ यांनी सांगितले की, जागतिक आकडेवारीनुसार संसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी अंदाजित ४ लाख ५० हजार लोकांना जीव गमवावा लागतो. यंदाही पावसाळ्यात गॅस्ट्रिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात १ हजारहून अधिक रुग्ण यकृत आणि जठराशी संबंधित आजारांमुळे उपचारासाठी येत आहेत. यात प्रामुख्याने यकृताला सूज येणे, पोटात गॅस होणे, आंबटपणा आणि अपचनाच्या तक्रारी दिसून येतात. म्हणूनच पावसाळ्यात पचनास हलके असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

-----------------------

अशी घ्या काळजी

- पावसाळ्यात पाणी दूषित होत असल्याने मासे खाणे टाळावे.

- मासे खाल्ल्याने कॉलरा किंवा अतिसार होण्याचा धोका असतो.

- रस्त्यावरील खाद्यपदार्थ किंवा थंडपेय पिऊ नका, यात बॅक्टेरिया असू शकतात.

- पचनशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा.

- नियमित आहारात लिंबाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

----------------------

पावसाळा या ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढते. दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने कॉलरा, जुलाब, कावीळ असे आजार वाढतात. अन्नातून विषबाधा, पोटदुखी, अल्सर होणे, मळमळ व उलट्या होणे असा त्रासही जाणवू लागतो. पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, पावसाळा ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढते. दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने कॉलरा, जुलाब, कावीळ असे आजार वाढतात. अन्नातून विषबाधा, पोटदुखी, अल्सर होणे, मळमळ व उलट्या होणे असा त्रासही जाणवू लागतो.

डॉ. रॉय पाटणकर, पोटविकारतज्ज्ञ