अडीच हजार टन राडारोडा गोळा; १५ आठवड्यात घनकचरा विभागाची विशेष माेहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:06 AM2024-03-11T10:06:08+5:302024-03-11T10:07:07+5:30
१८१ मंदिरांची सफाई.
मुंबई : स्वच्छ आणि सुंदर मुंबई शहरासाठी हाती घेण्यात आलेल्या डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून मागील जवळपास १५ आठवड्यांत २ हजार ४८७ टन राडारोडा आणि ८०० टनांहून अधिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. याशिवाय १८१ धार्मिक स्थळे आणि मंदिरांची सफाई ही स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
मात्र, महानगरपालिकेकडून होणारी संपूर्ण स्वच्छता मोहीम हा केवळ दिखावा असून, त्याचा मुंबईकरांना काहीच उपयोग होत नसल्याचा दावा मुंबईतील काही सामाजिक संघटना आणि संस्थांनी केला आहे.
मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस ढासळत आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर वाढावा यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर प्रदूषण वाढू नये यासाठी काही निर्बंधही घालण्यात आले असून, ३ डिसेंबरापासून ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम हाती घेतली आहे. या आधी आठवड्याच्या शनिवारी, रविवारी चालणारी मोहीम आता दर शनिवारी विविध वॉर्डांत राबवली जाते.
या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान-क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवालाविरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही केली जाते. शिवाय मुंबईला धुळीपासून मुक्ती देण्यासाठी रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे पाण्याने धुण्यात येत आहेत.
मात्र या मोहीमेबद्दल अनेकांनी मते व्यक्त केली. ४ टक्के लोकांना ही मोहीम यशस्वी झाल्याचे वाटत असून २० टक्के लोकांनी याला आणखी वेळ द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.
यंत्रांचा वापर -
डीप क्लीनिंग मोहिमेत अधिकारी आणि समाजातील विविध व्यक्ती आणि समूहांचा समावेश करून घेतला जात आहे. या मोहिमेत पालिकेत १ हजार १७८ वाहने आणि यंत्रांची मदत मिळाली आहे. यामध्ये जेसीबी, डंपर्स, कॉम्पॅक्टर्स, संकलन वाहने, पाण्याचे टँकर्स, धूळ नियंत्रित करणाऱ्या मिस्टिंग मशिन्स यांचा समावेश आहे.
डीप क्लीनिंग मोहिमेचा आढावा (२ मार्चपर्यंत) -
१) राडारोडा संकलन - २४८७ टन
२) भंगार वाहने, फर्निचर, टाकाऊ वस्तू - ३३० टनाहून अधिक
३) कचरा संकलन - ७६० टनाहून अधिक
४) मंदिरे आणि धार्मिक स्थळांची सफाई - १८१ ठिकाणांहून अधिक
हा तर पालिकेचा दिखाऊपणा -
१) विविध वॉर्डांत दर आठवड्याला राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेने अद्याप तरी मुंबईकर समाधानी नसल्याचे समोर आले आहे. मुंबई मॅटर्स या सामाजिक संस्थेने ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या सर्वेक्षणात मुंबईकरांना आपण किती समाधानी यासंबंधी प्रश्न विचारला होता.
२) याला मिळालेल्या प्रतिसादात ४१ टक्के लोकांनी हा दिखाऊपणा असल्याचे म्हटले असून, ३५ टक्के लोकांनी ही मोहीम अयशस्वी असल्याच्या शिक्का मारला आहे. मात्र यात ही ४ टक्के लोकांना ही मोहीम यशस्वी झाल्याचे वाटत असून २० टक्के लोकांनी याला आणखी वेळ द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.