मुंबई, दि. ९ : लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात १११०० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. या रक्तपिशव्यांपैकी १००० ते १२०० रक्तपिशव्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी विमानाने पाठविण्यात आल्या असून राज्यातील नागपूर व औरंगाबाद या भागातील काही दुर्गम भागात देखील या रक्तपिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी दिली.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात. राज्यातील तसेच देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात भासणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळामार्फत दि. ६ ऑगस्ट रोजी लालबाग परिसरात स्वैछिक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. या शिबिरामध्ये राज्यातील १३५ रक्तपेढ्यांनी सहभाग नोंदविला. शिबिरास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक सिनेकलाकार उपस्थिती होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळी व सचिव सुधीर साळवी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सदस्यांनीदेखील प्रयत्न केले.