मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोविडच्या दुसऱ्या लाटेत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईत रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ५,००० रक्त पिशव्या संकलित करण्याचा संकल्प हाती घेतला होता. त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला. ४ एप्रिलपासून रविवार ९ मेपर्यंत ३५ दिवसांत उत्तर मुंबईत आयोजित एकूण ६३ रक्तदान शिबिरांमधून ५,१५३ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले, तर ३० रक्तपेंढीचे मोलाचे सहकार्य लाभले.
उत्तर मुंबई मतदारसंघातील नागरिकांना त्यांनी
रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. ४ एप्रिलपासून येथे सुरू झालेल्या रक्तदान शिबिरात भाजप उत्तर मुंबईतील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील समाजाला आणि विविध संस्थांना सोबत घेऊन संयुक्त रक्तदान शिबिर आयाेजित केले होते.
या रक्तदान शिबिरांच्या महायज्ञात उत्तर मुंबईतील महिलांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. चारकोप येथे आयोजित रक्तदान शिबिरात रोजा सोडून रक्तदान करणाऱ्या मोहतर्मा नजमा हाश्मी यांनी रक्तदान
केले, तर बोरिवली येथील दोन ठिकाणी आयोजित एका घरातील चार बहिणींनी, तसेच माय-लेकीनेही रक्तदान केले.
यामध्ये विविध सामाजिक संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अभाविप, जैन, मुस्लिम, ते आगरी समाज, कोळी समाज, वागड समाज महिला मंडळ, युवक मंडळ, गणपती मंडळ, असे अनेक वेगवेगळ्या प्रत्येक स्तरावरून रक्तदान शिबिर आयोजित केले आणि रक्तदान करून उत्तर मुंबईत एकूण ६३ शिबिरे आणि पाच हजारांहून अधिक रक्त पिशव्या संकलनाचा विक्रमी आकडा गाठला, असे खासदार
गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.
रविवार, ९ मे रोजी सहा ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, तसेच जिल्हाध्यक्ष गणेश खनकर यांनी ५,००० रक्त पिशव्या संग्रह करायचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांचा स्मृतिचिन्ह देऊन रविवारी सहा ठिकाणी आयोजित वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात विशेष सत्कार केला.
वॉर्ड क्रमांक ४१च्या नगरसेविका संगीता शर्मा आणि भाजप मुंबई सचिव माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी सर्व कार्यक्रमात सहभागी जिल्हाध्यक्ष गणेश खनकर, विनोद शेलार, दिलीप पंडित, प्रकाश दरेकर, निखिल व्यास, सचिन शिरवडकर, रश्मी भोसले, नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका आसावरी पाटील व अन्य प्रतिष्ठित मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------