Join us  

राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना

By संतोष आंधळे | Published: October 07, 2023 9:02 PM

कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे प्रशासनाला कळून त्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नांदेड येथील शासकीय रुग्णलायतील मृत्यूचे तांडव झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णांलयाच्या एकूणच कार्यपद्धतीवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तात्काळ आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विशेष करून सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारी महाविद्यलये आणि संलग्न रुग्णलायत जाऊन माहिती घेण्यास सांगितले आहे. तसेच या रुग्णालयाच्या काही अडचणी त्यांच्या स्तरावर सोडविणे शक्य असेल तर सोडविण्यास सांगितले आहे. यामुळे येत्या आठवड्यात राज्यात कुठल्या रुग्णलायत काय अडचणी आहेत याची इत्यंभूत माहिती असणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे प्रशासनाला कळून त्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत.

सार्वजनिक रुग्णालयात आजच्या घडीला रुग्णांना अनेक औषधे मिळत नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना स्वखर्चाने या रुग्णालयात औषधे लागत असल्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री या प्रकरणी येत्या आठवड्यात बैठक घेऊन राज्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहे, आम्हाला ज्या सूचना बैठीकीत देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही काम सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या अखत्यारीत जे जे समूह रुग्णालये येतात.त्या ठिकाणची सर्व माहिती घेण्यात आली आहे. सध्या या रुग्णलायतील स्थिती चांगली आहे. राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी, मुंबई शहर.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेनांदेडनांदेडहॉस्पिटल