Join us

जिल्हाधिकारी कार्यालय अस्वच्छ

By admin | Published: November 05, 2014 10:12 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित केले आणि देशभरात ‘स्वच्छ भारत...समृद्ध भारत’ या विचारास मोठी चालना मिळाली

जयंत धुळप, अलिबागभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित केले आणि देशभरात ‘स्वच्छ भारत...समृद्ध भारत’ या विचारास मोठी चालना मिळाली. राज्यातही भाजपाचे सरकार आल्याने शासकीय स्तरावरही स्वच्छता मोहिमेला गती देण्याकरिता राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांच्या प्रधान सचिवांपासून जिल्हाधिकारी ते तलाठ्यांपर्यंत बैठकांनी वेग घेतला. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच गेल्या ३१ आॅक्टोबर रोजी ज्येष्ठ निरुपणकार तथा स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राष्ट्रीय एकता रॅलीचा शुभारंभ केला. परंतु त्याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था व अस्वच्छता पाहता, दिव्याखालीच अंधार याची प्रचिती येत आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी तयार झाली. इमारतीतच पहिल्या मजल्यावर असणाऱ्या स्वच्छतागृहाची योग्य देखभालीअभावी अत्यंत वाईट अवस्था झाली होती. जिल्हास्तरीय बैठकांना येणारे वरिष्ठ अधिकारी, विविध मान्यवर अभ्यागत आणि त्याच जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी येथील दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. अखेर रायगडचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जगन्नाथ वीरकर यांनी पुढाकार घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह काही लाख रुपये खर्च करुन बांधून घेतले. नव्या स्वच्छतागृहाच्या प्रारंभापासूनच येथे एका स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र ती झाली नाही आणि पुढील दोन-तीन महिन्यातच या नव्या स्वच्छतागृहाचे रुपांतर गलिच्छगृहात झाले. स्वच्छतागृहातील शौचालयांचे दरवाजेच निखळले आहे. याठिकाणी नळांना पाणीच नसल्याने ते वापरणे अशक्य आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये व सर्व प्रांताधिकारी कार्यालये यामधील स्वच्छतागृहांमध्ये यापेक्षा फार वेगळी परिस्थिती नाही.