प्रोजेक्ट क्रांती घडवितेय कलेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:28 AM2020-08-09T01:28:09+5:302020-08-09T01:28:13+5:30

जून २०१७ मध्ये केंद्र सुरू करण्यात आले; गरीब, गरजू, होतकरू आणि सक्षम मुलांसाठी मोफत उपक्रम

Collector is revolutionizing the project | प्रोजेक्ट क्रांती घडवितेय कलेक्टर

प्रोजेक्ट क्रांती घडवितेय कलेक्टर

Next

मुंबई : गरीब, गरजू, होतकरू मुलांसाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ज्ञानपीठ संस्थेने प्रोजेक्ट क्रांती नावाने मोफत उपक्रम सुरू केला आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी लाखो रुपये खर्चूनही शासकीय सेवेचे दरवाजे भल्याभल्यांना उघडत नसताना संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमातील दहा उमेदवार यावर्षी विविध शासकीय-निमशासकीय विभागातील भरतीसाठी पात्र ठरले आहेत. या केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी गरीब असणे, गरजू असणे आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याइतपत सक्षम असणे याच अटी आहेत.

हजारो आणि लाखो रुपये कनवटीला नसलेल्या होतकरू मुलांना शासकीय सेवेचा मार्ग खुला होणार की नाही, या भूमिकेतून सांगली येथील कुंडलमधील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ज्ञानपीठ संस्थेने जून २०१७ पासून प्रोजेक्ट क्रांती नावाने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
या ठिकाणी एमपीएससी, यूपीएससी, बँक, विमा, रेल्वे आदी क्षेत्रातील जवळपास २७ श्रेणींतील परीक्षांची तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून तयारी करून घेण्यात येते. यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांबरोबरच ४२ संगणक, इंटरनेट सुविधा, अद्ययावत ग्रंथालय, मुलामुलींसाठी स्वतंत्र अभ्यास वर्ग आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या मोफत वसतिगृहासाठी इमारत बांधण्यात आली आहे. याच इमारतीच्या अर्ध्या भागात प्रोजेक्ट क्रांती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

जनतेची सेवा करावी : यावर्षी तेथे १५० मुले आणि ८० मुली आहेत. शनिवार व रविवारी मुंबई, पुणे, सांगली, नाशिक, औरंगाबाद येथून तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून या मुलांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाते. शासकीय सेवेची संधी मिळाल्यावर या मुलांनी प्रामाणिकपणे राज्याची, जनतेची सेवा करावी एवढीच संस्थेची अपेक्षा असल्याचे डॉ. जी. डी. बापू लाड यांचे चिरंजीव प्रकाश लाड यांनी सांगितले.

आई अंगणवाडीत : पहिल्याच वर्षी चौघा जणांची निवड वेगवेगळ्या पदांसाठी झाली आहे. यातील मृणाल दादासो सिताफे या मुलीची वाहतूक अधिकारी म्हणून निवड झाली होती. तिला वडील नाहीत, तर आई अंगणवाडीत काम करून उदरनिर्वाह चालवत होती.

वडिलांची पानाची टपरी : रुपाली हरीष कदम या मुलीची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. तिचे वडील पानाची टपरी चालवत होते.
धनंजय हरिभाऊ कुंभार याचे आईवडील कुंभारकाम आणि शेतमजूर होते. त्याची बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून निवड झाली.

Web Title: Collector is revolutionizing the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.