महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन पद्धतीने, एटीकेटी, बॅकलॉगबाबत लवकरच निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 06:18 AM2020-07-05T06:18:45+5:302020-07-05T06:44:59+5:30
बारावीचा निकाल थोड्याच दिवसांत जाहीर होईल व प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये कशी आणि कधी सुरू होणार? शिकविण्या ई-लर्निंगच्या माध्यमातून कशा घेता येतील? यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली.
मुंबई : महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षही आॅनलाइन सुरू करण्याचे नियोजन आहे. याचप्रकारे एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ठरले.
बारावीचा निकाल थोड्याच दिवसांत जाहीर होईल व प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये कशी आणि कधी सुरू होणार? शिकविण्या ई-लर्निंगच्या माध्यमातून कशा घेता येतील? यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाचा राज्यातील संसर्ग पाहता सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत न बोलविता प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन कशी राबविता येईल यावर या वेळी चर्चा झाली. त्यानुसार, यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे द्वितीय व तृतीय वर्षासाठी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आॅगस्ट, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबरपासून करण्याचे नियोजन आहे.
एटीकेटी, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा शासन निर्णय होऊन १५ दिवस उलटले तरी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र अद्याप विद्यापीठांत रखडले आहे.
विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या आधीच्या कामगिरीच्या मूल्यांकनावर निकाल द्यायचा आहे. पण त्यासाठी ज्यांना एटीकेटी आहे, त्या विषयातले किती गुण ग्राह्यधरायचे, हा प्रश्न असल्याने फॉर्म्युला ठरविता येत नाही. मात्र, लवकरच अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी याबाबत चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या वेळी सांगितले. एटीकेटी, बॅकलॉगच्या परीक्षांचे नियोजन कधी करायचे याबाबत लवकरच विद्यापीठांना सूचना दिल्या जाणार आहेत.