मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या विश्वनाथ प्रभू साह (वय - ५०) यांना मालाड पूर्व येथील आप्पापाड्यात एका ठगाने मुलीचे मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देतो सांगून २० लाख रुपयांना चुना लावला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात राहणारे विश्वनाथ साह यांची मुंबईत आल्यांनंतर मालाड येथील आप्पापाड्यातील रविया बधिया चाळीत उत्तर प्रदेशात राहणाऱ्या कुमार नावाच्या इसमाशी ओळख झाली होती. साह यांच्या मुलीचे रांची येथे मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देतो असे सांगून २०१४ ते २०१८ दरम्यान २० लाख रुपये कुमारने साह यांच्याकडून उकडली. मात्र, बरेच महिने उलटून गेले तरी कुमार अॅडमिशनही करेना की, पैसेही परत देईना. शेवटी साह यांनी काल कुरार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी गुन्हा भा. दं. वि. कलम ४२० अन्वये दाखल केला असून आरोपी हा उत्तर प्रदेशचा आहे. त्याला लवकरच शोधून काढू असे सांगितले.