Join us

अकरावी प्रवेशाची शेवटची यादी ठरवणार महाविद्यालयाचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:16 AM

दुसऱ्या फेरीनंतर विद्यार्थी, पालकांचे या गुणवत्ता यादीकडे लक्ष

मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर होणार असून शेकडो पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. यंदा अकरावी प्रवेशाच्या तीनच फेऱ्या होणार असून यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याने आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात तिसऱ्या गुणवत्ता यादीत तरी आपला नंबर लागणार का? अशी धाकधूक विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. दुसऱ्या यादीनंतर मंगळवारी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या यादीसाठी मुंबई विभागात एकूण १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध आहेत. दुसऱ्या यादीत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून केवळ २८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी मिळून आतापर्यंत मुंबई विभागातून १ लाख १६ हजार १२८ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामध्ये कोट्यातील ३५ हजार १३२ जागांचा समावेश आहे.  दुसऱ्या यादीत ७६ हजार जागांवर अलॉटमेंट होऊनही केवळ २८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केल्याने तिसऱ्या यादीत प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शेवटच्या यादीवर पसंतीच्या महाविद्यालयाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.मागील वर्षाची स्थितीमागील वर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८ हजार ७१ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामधील सर्वाधिक जागा या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला बसलाच, मात्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे ही प्रक्रिया रेंगाळल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांत यंदा घट झाल्याचे मत तज्ज्ञ नोंदवित आहेत. अनेक पालक, विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेशच घ्यायचा रद्द केल्याने यंदाही अकरावीच्या लाखाहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे.तिसऱ्या फेरीसाठी  रिक्त जागा शाखा    उपलब्ध जागाकला    १४,५५७वाणिज्य    ६३,३५९विज्ञान    ३८,८६९एमसीव्हीसी    २,७६९एकूण    १,१९,५८१