मुंबई विद्यापीठासह महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:11 AM2019-08-01T06:11:32+5:302019-08-01T06:11:40+5:30
आचारसंहिता १९ आॅगस्टपासून; पूर्णकालीन, नियमित विद्यार्थ्यालाच मिळणार उमेदवारी
मुंबई : मुंबई विद्यापीठानेमहाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता १९ आॅगस्टपासून लागू होणार आहे. तर विविध पदांसाठी ३० आॅगस्टला मतदान होणार आहे.
मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठी वर्ग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी प्राचार्य आणि संचालक यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकीचा निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाला पदाधिकाऱ्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.
विद्यार्थी संघाची निवडणूक पूर्णकालीन व नियमित विद्यार्थ्यांनाच लढवता येणार आहे. उमेदवाराने कोणताही विषय शिल्लक ठेवलेला नसावा; तसेच त्याने एटीकेटीदेखील घेतलेली नसावी. एकाच वर्गात फेरप्रवेश घेतलेला नसावा. याशिवाय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विलंबाने शिक्षण घेणाºया नियमित विद्यार्थ्यांना निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय पदवीला प्रवेश घेतल्यापासून सात वर्षे शिक्षण घेतलेले असल्यास, परीक्षा विषय गैरप्रकारात शिक्षा झाली असल्यास अथवा गुन्ह्यात दोषी ठरविले असल्यास विद्यार्थ्याला ही निवडणूक लढविता येणार नाही.
अशी राबविण्यात येणार प्रक्रिया
महाविद्यालये व विद्यापीठाच्या प्रत्येक विभागातून वर्ग प्रतिनिधी निवडण्यात येतील. त्या वर्ग प्रतिनिधींमधून महाविद्यालयातील अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व आरक्षित जागांवरील प्रतिनिधींची थेट निवडणूक होईल. त्यासाठी महाविद्यालयांमधील सर्व नियमित विद्यार्थी मतदान करतील. संलग्न महाविद्यालये व विद्यापीठाच्या विभागांमधून निवडून आलेले अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी तसेच मागासवर्गीय प्रतिनिधींची मतदार यादी तयार होईल. त्या मतदारांना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, सचिव, महिला व आरक्षित जागांवरील प्रतिनिधींकरिता मतदान करावे लागणार आहे.