महाविद्यालयांचे परीक्षण अनिवार्य; माहिती एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:41 AM2020-04-24T01:41:05+5:302020-04-24T01:41:09+5:30

अभ्यासक्रम शुल्क, सुविधा आणि उपक्रमांचा तपशील

College examinations mandatory; Information at a click | महाविद्यालयांचे परीक्षण अनिवार्य; माहिती एका क्लिकवर

महाविद्यालयांचे परीक्षण अनिवार्य; माहिती एका क्लिकवर

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात, एखाद्या अभ्यासक्रमाचे शुल्क किती आहे, प्रवेश क्षमता किती आहे, त्या महाविद्यालयात कोणत्या पायाभूत सुविधा आहेत अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांची माहिती आता सर्वांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक परीक्षणासाठी विद्यापीठाने माहितीचे आॅनलाइन संकलन केले आहे. सुमारे ४००हून अधिक महाविद्यालये आणि संस्थांनी माहिती भरली असून, ही माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचे अध्ययन-अध्यापन, कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानात्मक करण्याची तरतूद आहे. तसेच व्यवस्थापनाची व्यवहार्यता आणि वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे महाविद्यालयांच्या, विद्याशाखांच्या आणि विषयाच्या शैक्षणिक कामगिरीची मानके लक्षात घेता महाविद्यालयांच्या संलग्निकरणाच्या आणि परिसंस्थांच्या मान्यतेच्या शर्ती निर्धारित करणे आणि त्या शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे़

याबाबत नियतकालिक किंवा अन्य प्रकारे मूल्यांकन करून स्वत:ची खात्री पटविणे अशीही जबाबदारी विद्यापीठांवर असल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व ८२३ महाविद्यालये आणि परिसंस्था यांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे आणि कार्यबलाचे गठण करण्यात आले होते. यानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर अ‍ॅकेडेमिक आॅडिट पोर्टलच्या रूपाने आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामध्ये सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांची महाविद्यालयासंबंधी सर्व माहिती १५ जानेवारी २०२० पर्यंत भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार जवळपास ४०० हून अधिक महाविद्यालयांनी माहिती भरली आहे. मात्र ज्या महाविद्यालयांनी अजूनही माहिती भरलेली नाही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण हे अनिवार्य असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

शैक्षणिक परीक्षण करणे गरजेचे
सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन महाविद्यालयासंबंधी माहिती १५ जानेवारी २०२० पर्यंत भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. ४००हून अधिक महाविद्यालयांनी माहिती भरली आहे.

ज्या महाविद्यालयांनी अजूनही माहिती भरलेली नाही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. शैक्षणिक परीक्षण हे अनिवार्य असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

Web Title: College examinations mandatory; Information at a click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.