महाविद्यालयीन परीक्षा काही ठिकाणी सुरळीत पार; काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा ढकलल्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 09:46 PM2020-10-12T21:46:09+5:302020-10-12T21:46:18+5:30
विद्यापीठाच्या ३२ क्लस्टरमधील ५ क्लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
मुंबई: काही काळासाठी खंडीत झालेल्या वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयातील काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या तर काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कला, वाणिज्य आणि विज्ञान समुह महाविद्यालयांच्या एकणू ४२ समुहांपैकी ३२ समुहांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडल्या. यामध्ये १९ हजार २७९ एवढ्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ९५० एवढ्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यापीठाच्या ३२ क्लस्टरमधील ५ क्लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर १० समुह महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या मध्ये केसी महाविद्यालयाचा समावेश असून त्यांच्या सोमवारी नियोजित परीक्षा आता रविवारी होणार आहेत.
सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षा या सुरळीत पार पडल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी दिली. इतर पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नियोजन त्या-त्या महाविद्यालयांच्या मार्फत करण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या नसल्या तरी विद्यार्थिनींना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षा देण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.
सोमवारी विद्यापीठ विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या असून एकूण ५८२ विद्यार्थ्यांपैकी ५६१ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. अभियांत्रिकी आणि एमसीएच्या एकूण १० समुहातील सोमवारच्या नियोजीत बॅकलॉगच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षांचे नियोजन १४ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले आहे. तर फार्मसीच्या तीनही समुहातील आजच्या नियोजित परीक्षा आता १५ ऑक्टोबर, २०२० ला होणार आहेत.
शिक्षणशास्त्रच्या १० समुहातील दोन महाविद्यालये वगळता इतरांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या यामध्ये २०१८ विद्यार्थ्यांपैकी २००७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्पेशल एज्युकेशन, फिजीकल एज्युकेशन आणि सोशल वर्क समुहांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. विधी समुहातील ९ क्लस्टरमधील ७ महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून उर्वरीत ५०५ विद्यार्थ्यांपैकी ५०४ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत झाली आहे.