कॉलेजचा स्लॅब कोसळला
By admin | Published: September 12, 2015 11:25 PM2015-09-12T23:25:30+5:302015-09-12T23:25:30+5:30
प्रधान महाविद्यालयाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. यावेळी इमारतीमधील प्रयोगशाळेत शंभर विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग
नागोठणे : प्रधान महाविद्यालयाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. यावेळी इमारतीमधील प्रयोगशाळेत शंभर विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग कार्यरत होता. मात्र स्लॅबमधील माती कोसळत असल्याचे आवारात उभ्या असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी धावत पहिल्या मजल्यावर जाऊन प्रयोगशाळेतील सर्वांना इमारतीच्या बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणात इमारतीचा स्लॅब खाली कोसळला. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय असून 1992 साली तत्कालीन उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले होते.महाविद्यालयात शास्त्र विषयाच्या विविध शाखा असून आज सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालय चालू झाले असता,आठच्या सुमारास याच संकुलातील कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावीच्या वर्गातील शंभर विद्यार्थी या इमारतीतील प्रयोगशाळेत गेले होते. त्यावेळी इमारतीचे खाली उभे असणारे महाविद्यालयाचे गणपत मेंगाळ आणि चंद्रकांत देवळे या दोन कर्मचाऱ्यांना स्लॅबमधून सिमेंट पडताना दिसले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील प्रयोगशाळेकडे धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना इमारतीच्या बाहेर काढले. आणि काही क्षणात स्लॅब कोसळला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून एकही विद्यार्थी जखमी झाला नाही. दुर्घटनेनंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. कोएसो,अलिबागचे प्रशासकीय अधिकारी के. डी. म्हात्रे आणि गावडे यांनी सुद्धा भेट देवून माहिती जाणून घेतली आहे. सोमवारपासून बीएससी तृतीय वर्षाची प्रात्यिक्षक परिक्षा आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारपासून महाविद्यालयाचे सर्व वर्ग याच संकुलात दुसर्या इमारतीत नियमतिपणे चालू होणार असून प्रयोगशाळा, पुस्तक वाचनालय एक आठवडा बंद राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी दिली.
इमारतीचा काही भाग अजूनही कोसळण्याची शक्यता असल्याने या परिसरात कोणीही जावू नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
विद्यासंकुलाचे साधारणत: पन्नास मीटर पुढे रेल्वेमार्ग आहे. पूर्वी याठिकाणी एकच मार्गिका होती. आता तीन मार्ग वाढविण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयोजन असून हे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रु ंदीकरण करण्यासाठी खोदकाम करण्यात येत असून तशी यंत्रसामुग्री वापरण्यात येत आहे.
यंत्रांद्वारे चोवीस तास खोदकाम केले जात असल्याने जमिनीला हादरे बसत आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याकडे संबंधित प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष झाले आहे. याचाच परिणाम म्हणून शनिवारी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.