मुंबई - वर्सोवा पोलीस ठाण्यालगत असलेल्या वालिया महाविद्यालयातील ‘बॅचलर आॅफ मास मीडिया’च्या विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. महिला दिनाच्या निमित्ताने राज्यशास्त्र विषयासाठी मुलाखत घेताना विद्यार्थिनींनी लव्हेकर यांच्याशी मनमोकळेपणाने संवादही साधला.देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँकची स्थापना करण्याचे काम डॉ. भारती लव्हेकर यांनी केले आहे. ही बँक कशी चालते? याविषयी असलेली जिज्ञासा अनेक प्रश्नांद्वारे विद्यार्थिनी विचारत होत्या. डॉ. लव्हेकर यांनी विद्यार्थिनींच्या सर्व शंकांचे निरसन केले. ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ची अनोखी कल्पना त्यांनी विद्यार्थिनींना उलगडून सांगितली.डॉ. लव्हेकर म्हणाल्या, सर्वसामान्य महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या आणि आजाराबद्दल उघडपणाने बोलले जात नव्हते. त्यामुळे आमच्या बँकेने पुढाकार घेत समाजातील गरीब महिलांना दरमहा नियमित स्वरूपात १० सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी जनजागृतीही करतो. सॅनिटरी नॅपकिन ही चैनीची गोष्ट नसून मासिक पाळीदरम्यान प्रत्येक स्त्रीने त्याचा वापर करायला हवा, हाच संदेश जागतिक महिला दिनानिमित्त देऊ इच्छिते.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी ‘पॅडवुमन’च्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 4:50 AM