महाविद्यालयातूनच घडेल उद्याचे खंबीर नेतृत्व

By admin | Published: January 12, 2017 05:41 AM2017-01-12T05:41:11+5:302017-01-12T05:41:11+5:30

महाविद्यालय, विद्यापीठात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

The college will have strong leadership of tomorrow | महाविद्यालयातूनच घडेल उद्याचे खंबीर नेतृत्व

महाविद्यालयातूनच घडेल उद्याचे खंबीर नेतृत्व

Next

महाविद्यालय, विद्यापीठात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार, निवडणुका सुरू होणार असल्यामुळे, विद्यार्थ्यांमधून युवा नेतृत्व पुढे येणार आहे. १९९५पासून अशा पद्धतीने विद्यापीठ, महाविद्यालयातून युवा नेतृत्व पुढे आले नसल्याने, आता कॅम्पसमधील निवडणुकांविषयी उत्सुकता दिसून येत आहे. येणारे नवे युवा नेतृत्व कसे असेल? ते काय बदल घडवू शकेल? याविषयी विद्यापीठात सक्रिय असणाऱ्या युवा नेत्यांशी राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने आमचे प्रतिनिधी पूजा दामले यांनी साधलेला हा संवाद.....

‘युवकांच्या माध्यमातून देशाचा फायदा’
महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या निवडणुकांत राजकीय पक्ष सक्रिय दिसून येत होते. या निवडणुकांचा मुख्य हेतू हा विद्यार्थी पुढे यावेत, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळवा, असा आहे. राजकीय पाठबळ अथवा राजकीय पक्षाचा समावेश नसणाऱ्या युवा संघटना, विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. या संघटनांमधून पुढे येणारे नेतृत्व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतील. गेल्या काही वर्षांत वाढलेला विद्यापीठातील गोंधळ कमी होण्यासाठी तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा आहे. निवडणुकांमुळे तो त्यांना मिळणार आहे.
- सचिन बनसोडे, अध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना


‘नवे नेतृत्व निर्माण होईल’
महाविद्यालयीन निवडणुका लढून अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयात नेतृत्व करणाऱ्या तरुणांनी त्यानंतर राजकीय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. सध्याच्या तरुण पिढीला ही एक उत्तम संधी आहे. नव्वदच्या दशकात जेव्हा विद्यापीठ, महाविद्यालयीन निवडणुका बंद झाल्यानंतर या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात, म्हणून २०१० मध्ये आम्ही प्रयत्न केले होते. आज ते अंमलात आल्यामुळे तरुण नेतृत्व पुढे येईल याचा आनंद आहे. नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियामध्ये (एनएसयूआय) ‘ओपन इलेक्शन’ पद्धती वापरली जाते. त्यामुळेच तळागाळातल्या मुलांना पुढे येण्याची संधी मिळते.
- सूरज ठाकूर, माजी प्रदेश अध्यक्ष, नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया

‘शिक्षण पद्धतीत बदल व्हावा’
विद्यापीठ कायद्यातील निवडणुकांच्या समावेशामुळे युवा नेतृत्व मिळणार आहे. सध्या विद्यापीठात सिनेटमध्ये असलेली कार्यपद्धती बदलणे गरजेचे आहे, तरच काम करणारे विद्यार्थी पुढे येतील. त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळेल. ‘त्या’ चेहऱ्याला खरी किंमत असणार आहे, पण निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप जास्त प्रमाणात नको. प्रामाणिकपणे काम करणारे, प्रश्न सोडवण्यास सक्षम असणारे असे चेहरे पुढे येतील.
- डॉ. सुप्रिया कारांडे, सिनेट सदस्य, युवा सेना

‘युवा संघटनांनी पुढे येण्याची गरज’
विद्यापीठ कायदा पास झाल्याने पुन्हा एकदा युवा नेतृत्व मिळणार याचा आनंद आहे, पण याविषयी जनजागृती व्हायला हवी. युवा संघटनांनी एकत्र येऊन जनजागृती केल्यास अनेक युवा चेहरे समोर येतील. अनेकदा राजकीय पक्षाचे पाठबळ नसल्याने पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलले जायचे, पण आता या निवडणुकांमध्ये तळागाळाला काम करणाऱ्या युवा संघटना पुढे आल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधीमुळे त्यांना न्याय मिळण्यास सोपे जाईल. या आधी दुसऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न मांडावे लागत होते, आता परिस्थिती बदलेल.
- विजेता भोणकर, राज्य अध्यक्ष, विद्यार्थी भारती संघटना


नेतृत्वासाठी मिळणार फ्रेश चेहरे

१९९५ पर्यंत महाविद्यालयीन, विद्यापीठ निवडणुका सुरू होत्या. त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती, पण आता नव्याने होणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण उत्सुक आहेत. या वेळी कायद्यात आचारसंहितेचा समावेश करण्यात आल्यामुळे तरुण निवडणुकीचा खऱ्या निवडणुकांसारखा आनंद घेऊ शकणार आहेत. कॅम्पसमध्ये तयार होणारे नेतृत्व हे पुढे जाऊन राजकीय नेतृत्वदेखील होऊ शकते. नेतृत्वाचा नवीन चेहरा याच निवडणुकांमधून मिळणार आहे. महाविद्यालयात पातळीवर जीएस निवडून आल्यामुळे, आता विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत.
- सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

नेत्यांना असेल गांभीर्याची जाणीव
महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर विद्यार्थ्यांना अनेक समस्या, प्रश्न आहेत, पण या प्रश्नांना, समस्यांना सोडवण्यासाठी त्यांना नेतृत्व मिळत नाही. निवडणुकांमुळे आता हे नेतृत्व त्यांना सहज उपलब्ध होणार आहे. कॅम्पसमध्ये निवडून आलेले विद्यार्थी नक्कीच सर्वांना मदत करतील. त्यांच्यातूनच नेता निवडून गेला असल्यामुळे, त्या नेत्याला प्रश्न व त्याची गांभीर्याची जाण असणार आहे.
- संजय वैराळ, माजी सिनेट सदस्य

Web Title: The college will have strong leadership of tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.