मान्सून ‘फॅशनेबल’ करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाई उत्साही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:14 AM2018-06-19T02:14:00+5:302018-06-19T02:14:00+5:30
पावसाचा जोर जसा वाढला आहे, तसा मान्सूनमधील खरेदी-विक्रीला जोर आला आहे.
मुंबई : पावसाचा जोर जसा वाढला आहे, तसा मान्सूनमधील खरेदी-विक्रीला जोर आला आहे. तरुणाई मान्सून ट्रेंडचा शोध घेत मुंबईतील बाजारात फिरताना दिसत आहे. मान्सून फॅशनेबल करण्यासाठी फॅशनेबल छत्री, रेनकोट, कपडे, बॅग, घड्याळ, शूज आदी वस्तंूच्या खरेदीकडे कॉलेज तरुणाई वळत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये झुंबड वाढतच चालली आहे.
फोर्ट येथील फॅशन स्ट्रीट, वांद्रे येथील लिकिंग रोडवर गर्दी वाढली आहे. ‘स्वस्तात मस्त’, ‘इकडे बघा, झगमगाट’, ‘ले लो १५० मे ले लो...’ अशा आरोळ्या देत विक्रेते देखील ग्राहकांना आपल्याकडे वळवत आहेत. नेहमीप्रमाणे काळी छत्री वापरण्यापेक्षा तरुणाई कलरफुल छत्री विकत घेत आहे.
>नायलॉन, शिफॉन, पॉलिस्टर, सिल्कसारख्या कापडाचे कपडे खरेदी करण्यावर अधिक भर दिला जात आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत कपड्यांच्या किंमती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पावसाळी प्लॅस्टिक बूट, टायगर बूट खरेदी करण्यात येत आहे. २५० ते ३०० रुपये या बूटांच्या किमती आहेत.
पावसाळा असला तरी तरुणाई गॉगल वापरते. त्यामुळे १०० ते १५० रुपये किमतीचे गॉगल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कमी किमतीमधील वॉटरप्रूफ घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत.