महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांकडे शुल्क आकारणीसाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:07 AM2021-03-18T04:07:03+5:302021-03-18T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळांच्या शुल्कवसुली संदर्भातल्या तक्रारी एकीकडे वाढत असताना आता महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांवर शुल्क वसुलीसाठी दबाव आणला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळांच्या शुल्कवसुली संदर्भातल्या तक्रारी एकीकडे वाढत असताना आता महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांवर शुल्क वसुलीसाठी दबाव आणला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थी प्रचंड गोंधळे असून विद्यार्थी संघटनांकडे धाव घेत आहेत.
घाटकोपर येथील पुणे विद्यार्थी गृह महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, शुल्क भरावे किंवा पालकांसोबत प्राचार्यांना भेटावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा संदेश पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. सदर विद्यार्थ्यांनी या घटनेची तक्रार विद्यार्थी संघटनेकडे केली असून विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कोरोना काळात विद्यार्थी पालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचेच दिसून आले आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे घाटकोपर येथील पुणे विद्यार्थी गृह महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आणि मनविसेचे अधिकारी यांनी थेट प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला.
दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून यासंदर्भात चुकीची माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले असले तरी विद्यापीठाकडून सदर महाविद्यालयावर विद्यापीठ नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई व्हावी, अशी मागणी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या नियमांनुसार महाविद्यालयांना विकास निधीअंतर्गत ५०० रुपये शुल्क घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असतानाही या महाविद्यालयाने ४७०० रुपये विद्यार्थ्यांकडून स्वीकारले आहेत. याबाबत मनविसेने महाविद्यालयाकडे खुलासा मागितला असून सदर मागणी केल्याचे स्पष्ट केले आहे.