निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेली महाविद्यालये मदतीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 07:20 PM2020-07-22T19:20:00+5:302020-07-22T19:20:54+5:30
मुंबई विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर; विद्यापीठाचा मात्र बैठकांचा खेळ सुरूच
मुंबई : मुंबई विद्यापीठ गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन निधीसाठी प्रति विद्यार्थी १० रुपये तर कुलगुरू निधीसाठी २० रुपये जमा करत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ८०० महाविद्यालयात दरवर्षी शिक्षण घेणारे सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांकडून हा निधी घेण्यात येत आहे. मात्र या निधिचा वापर करण्याची वेळ आल्यावर अधिकारी प्रशासनाच्या केवळ बैठकांचे खेळ सुरु आहेत. निसर्ग चक्रवादळात रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या महाविद्यालयाये मदतीच्या प्रतीक्षेत असताना या कोट्यवधींच्या निधीचा वापर होत नसेल तर मुंबई विद्यापीठाच्या या आपत्कालीन निधीचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्या मोठ्या प्रमाणावर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांना बसला. या वादळात महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयांना प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही आपत्कालीन निधीतून मदत मिळालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर पडला असल्याचा आरोप राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. या महाविद्यालयांना तातडीने मदत देण्यासह इतर पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी तांबोळी यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या महिन्यात ३ जून रोजी कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. वादळामुळे या परिसरातील १६ महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व प्राचार्यांनी एक विशेष दौरा केला. या दौऱ्यादरम्यान महाविद्यालयांमधील संगणक, खुर्च्या, टेबल, फॅन यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. या दौऱ्यानंतर विद्यापीठाने शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही आपत्कालीन मदत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला नाही. विद्यापीठाने या महाविद्यालयांना मदत देण्यासाठी समिती गठित केली. परंतु अद्याप हा निधी देण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यातून समिती आणि विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार उजेडात आला असल्याची प्रतिक्रिया ततांबोळी यांनी दिली.
निधी देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन बैठकांचा खेळ करत असतानाच प्राचार्य आणि विविध संघटनांनी महाविद्यालये पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याप्रमाणे संगणक, फॅन, खुर्ची, लायब्रीमधील कपाट, ट्यूब, प्रिंटर, फळे आदी साहित्य विविध संघटनांनी जमा केले आहे. महाविद्यालयांना दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च येणार असल्याने संस्थाचालकांचे लक्ष विद्यापीठाच्या मदतीकडे लागले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार नवीन महाविद्यालय, तुकडी सुरू करताना महाविद्यालयांना बँकांमध्ये ठेवी ठेवणे बंधनकारक आहे. ह्या ठेवी प्रत्यकी किमान पाच लाखाच्या प्रत्येक नवीन विषय/तुकडी इत्यादी साठी कराव्या लागतात. म्हणजे एखाद्या महाविद्यालयास दोन नवीन विषय सूरू करायचे असतील तर अशा दोन ठेवी कराव्या लागतात. त्याशिवाय सोईसूविधांसाठी तरतूदी म्हणून वेगळ्या रकमा दाखवायला लागतात. तात्पर्य अशा रकमा ना महाविद्यालयास वापरता येत ना विद्यापीठास. आपत्कालीन परिस्थितीत हा निधी वापरता आल्यास याचा निदान काही सार्थ उपयोग तरी होईल. यासाठी सिनेट सदस्यांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या महाविद्यालयांनी तांबोळी यांच्याकडे केली आहे.
त्यानुसार तांबोळी यांनी कुलगुरूंना पत्र लिहून ठेवीचा वापर आपत्कालीन कामे करण्यासाठी करण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयांना अशा प्रकारे दिली जाणारी परवानगी ही तात्कालिक व विनाविलंब तसेच विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीपासून स्वतंत्र असावी, असेही तांबोळी यांनी पत्रात म्हंटले आहे.